अंबरनाथ: राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर महायुतीतील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र आता महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पहायला मिळते आहे. बदलापुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती जाहीर करून शिवसेनेला धक्का दिला होता. त्यानंतर आता अंबरनाथ शहरात भाजपने थेट शिवसेनेचा माजी नगरसेवकच पळवला आहे. रवींद्र चव्हाणांनी भाजपात नगरसेवकाला प्रवेश दिल्याने आता अंबरनाथमध्ये शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही युतीधर्म पाळतो मात्र असे होत राहिल्यास आमच्याकडेही भाजप नगरसेवकांची यादी आहे, असा इशारा किणीकर यांनी दिला आहे.

राज्यात जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, महापालिकांमध्ये यासाठी प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षण हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता मतदार याद्यांवर काम सुरू आहे. मात्र हे सुरू असताना प्रभागाची रचना स्पष्ट झाल्याने राजकीय पक्षही जय्यात तयारी करत आहेत. प्रभाग निहाय उमेदवारांची चाचपणी केली जात असताना इतर पक्षातील व्यक्तींनाही प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना धक्का देत थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती जाहीर केली होती. याला काही दिवस उलटत नाही तोच आता अंबरनाथ शहरात भाजपने शिवसेनेच्या माजी नगरसेवकालाच गळाला लावले आहे. अंबरनाथचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी गेल्या वर्षात कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र भाजपे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत यादव यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी शहरातील भाजपाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र या प्रवेशावरून महायुतीतील शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे.

यावर सर्वप्रथम स्थानिक शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन नये अशा सूचना केल्या होत्या. युतीधर्म पाळण्याच्या त्या सूचना होत्या. मात्र त्यानंतरही असा प्रवेश होणे चुकीचे असल्याचे आमदार किणीकर यांनी सांगितले आहे. आमच्याकडेही भाजपच्या नगरसेवकांची यादी आहे, असा इशाराही आमदार किणीकर यांनी दिला आहे.

या पक्ष प्रवेशानंतर अंबरनाथमध्येही शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यापासून भाजपच्या वतीने स्थानिक समस्यांवरून पालिकेवर मोर्चा नेला जातो आहे. मात्र अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच लक्ष्य केले जाते आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर आता शिवसेना आणखी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.