डोंबिवली – मागील अनेक वर्षापासून डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर मनसे डोंबिवली शाखेतर्फे दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. या रोषणाईचे उद्घाटन दरवर्षी मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एका व्यासपीठावर आणि एकत्र येण्याची चिन्हे असल्याने शनिवारी रात्री डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला.

विद्युत रोषणाई मनसेकडून केली गेली असली तरी त्याचे उद्घाटन मात्र ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, संघटक हर्षद पाटील, ठाकरे गटाचे तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, मनसेचे शहरप्रमुख राहुल कामत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मराठी माणूस आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी हे एकजीव होणे ही लोकांची, कार्यकर्त्यांची मागणी होते. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेने एकत्र येऊन कार्यक्रम करणे, विकास कामांचा पाठपुरावा करणे यात नवीन असे काही नाही. शिळफाटा रस्त्यावरील पलावा पुलाच्या उद्घाटनानिमित्त डोंबिवलीत पहिले ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले. आणि एकत्रितपणे आंदोलन केले.

त्यानंतर ठाकरे आणि मनसे एकत्र युतीचे वारे वाहू लागले. तेच वारे आता राज्यभर वाहू लागले आहेत, असे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी सांगितले.
ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते पक्ष म्हणून वेगळे असले तरी दहा वर्षापूर्वी आम्ही सगळे एकाच पक्षात होतो. आमची विचारणी, काम करण्याची राजकीय पध्दत एकच होती.

त्यामुळे आम्ही दहा वर्षांनी एकत्र आलो तरी आम्ही पक्ष म्हणून वेगळे असलो तरी आमची विकासाच्या विषयावर, मराठी माणूस आणि त्याचे हक्क या विषयावर एकच आहोत. एकच असणार आहोत. हा संदेश आता लोकांमध्ये गेला आहे. अशी एकत्रितपणे येऊन काम करण्याची आमची वाटचाल आता जोमाने सुरू राहील, असा विश्वास जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत ठाकरे गट, मनसे युती झाली तर त्याचा कोणाला फटका बसेल याची गणिते आता इतर पक्षांनी करण्यास सुरूवात केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत बहुसदस्य प्रभाग पध्दती आहे. त्यामुळे चार जणांचा एक गट करण्यासाठी भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जोरदार व्यवूहरचना सुरू आहे. अपक्ष म्हणून यापूर्वी आपली मातब्बरी कायम ठेवणारे यावेळी अस्वस्थ आहेत.