ठाणे : बेकायदा बांधकामामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरात फेरिवाले वाढल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने काही दिवसांपुर्वी हप्तेबाजीचा आरोप केला असतानाच, त्यापाठोपाठ येथील पदपथ आणि रस्ते गिळंकृत करणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात भाजपने गुरुवारी दिवा चौकात रास्तारोको आंदोलन केले. आठ दिवसानंतर एकही फेरीवाला दिसला तर कुणी कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीने भाजप हा प्रश्न सोडवेल, असा इशारा यावेळी भाजपच्या नेत्यांनी दिला.
ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा भागातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो. असे असतानाच, गेल्या काही महिन्यांपासून फेरिवाल्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावरून पालिका प्रशासनावर सातत्याने टिका होत आहे. रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी करीत आहेत. परंतु या तक्रारींविरोधात ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या हातगाड्यांमुळे सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच दिव्यात फेरीवाल्यांकडून दररोज ५० रुपये हप्ता वसूली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी केला होता. त्यापाठोपाठ फेरिवाल्यांच्या त्रासाविरोधात भाजप नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
दिवा स्थानक आणि परिसर, गणेशनगर, साबे, मुंबादेवी कॉलनी रस्ता, या परिसरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. वारंवार पत्रव्यवहार, महापालिकेत भेटीगाठी, निवेदने अशा प्रकारे हा प्रश्न महापालिकेच्या निदर्शनास आणूनही काहीच कारवाई होत नव्हती. यामुळे भाजपने ११ जुलै रोजी रास्ता रोको करण्याचे ठरवले होते. तसे रीतसर पत्रही त्यांनी महापालिकेत दिले होते.
यानंतर सहाय्यक उपायुक्त नागरगोजे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी फेरिवाल्यांवर कारवाई केली. मात्र, पथक माघारी फिरताच त्याच दिवशी सायंकाळी फेरीवाल्यांनी पुन्हा ठाण मांडले. या प्रकारामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आंदोलनामुळे येथे वाहतूक कोंडी झाली. सुमारे तासभरानंतरही भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी भाजप पदाधिकारी संजय वाघुले, नंदू परब, सचिन भोईर, विजय भोईर, रोशन भगत, गणेश भगत, सतीश केळशीकर यांना ताब्यात घेऊन दिवा पोलिस चौकीत नेले.