डोंबिवली – १५ डबा लोकल प्रत्येक फलाटावर थांबण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट विस्तारिकरणाचे काम सुरू केले आहे. डोंबिवली, मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट विस्तारिकरणा बरोबर आता मध्य रेल्वे प्रशासनाने डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाचे कल्याण दिशेकडील फलाटाच्या विस्तारिकरणाचे काम सुरू केले आहे. या कामासाठी प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.
कोपर रेल्वे स्थानकातील कल्याण बाजूकडील फलाट क्रमांक दोन विस्तारिकरणाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. या कामामध्ये फलाट क्रमांक एक आणि दोन यांना जोडणारी पादचारी मार्गिका बाधित होत आहे. या मार्गिकेचे छत काढून टाकण्यात आले आहे. मार्गिकेचे छत काढल्यामुळे प्रवाशांना उन, पावसातून प्रवास करावा लागत आहे. या विस्तारिकरणाच्या कामामुळे कोपर रेल्वे स्थानकात येत्या काही दिवसात पंधरा डब्याच्या लोकलला थांबा मिळणार आहे.
कोपर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे मार्गावरील जमिनीवरील रेल्वे स्थानक आणि दिवा-वसई, वसई-पनवेल मार्गावरील उन्नत कोपर रेल्वे स्थानक अशी दोन स्थानके आहेत. मुंबई परिसरात जाणारा आणि कल्याण, कर्जत, कसाराकडे जाणारा प्रवासी जमिनीवरील रेल्वे स्थानकातून प्रवास करतो.
वसई, विरार, पनवेल परिसरात जाणारा प्रवासी उन्नत कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करतो. बदलापूर, कल्याण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ परिसरातील नोकरदार, व्यावसायिक भिवंडी औद्योगिक क्षेत्र, वस्तू दळणवळण केंद्र, वसई, विरार, वापी, गुजरात, डहाणू, अलिबाग, पनवेल भागात जाण्यासाठी उन्नत कोपर रेल्वे स्थानकाचा वापर करतात. मध्य रेल्वे मार्गाच्या दादर रेल्वे स्थानकातून जाण्याऐवजी प्रवासी वसई, विरार, डहाणू भागात जाण्यासाठी उन्नत कोपर रेल्वे स्थानकाला सर्वाधिक प्राधान्य देतात. या प्रवासामुळे सुमारे एक तासाचा वळसा वाचतो.
कोपर पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात नवीन गृहसंकुले वाढत आहेत. वस्ती वाढत आहे. त्यामुळे कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मागणीचा विचार करून रेल्वेने तिकीट खिडक्या, पादचारी मार्ग, जिने उपलब्ध करून दिले आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. त्या तुलनेत कोपर रेल्वे स्थानकात गर्दीचे प्रमाण कमी असल्याने डोंबिवलीतील अनेक प्रवासी कोपर रेल्वे स्थानकात येऊन सकाळच्या वेळेत मुंबईचा प्रवास सुरू करतात.
दोन रेल्वे स्थानकांचे जंक्शन कोपर रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकात येत्या काळात पंधरा डब्याची लोकल थांबणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.