Dahi handi utsav 2025 : ठाणे : शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) हे दोन्ही बंधू एकत्र आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकूणच या सर्व घडामोडींमुळे आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच, मनसे नेते अविनाश जाधव (Avinash jadhav) यांनी दहीहंडी कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सुचक विधान केले आहे.
ठाणे येथील भगवती शाळेच्या मैदानात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसेच्या वतीने दहीहंडी उभारली आहे. मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी या शीर्षकाखाली हा उत्सव साजरा केला जात आहे. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत एक विधान केले आहे.
मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांची युतीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा बंधूंचा आहे. मी मराठी माणूस आहे. एका मराठी कुटूंबात झाला जन्म झाला आहे. आमच्या घरात बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानले जाते. माझ्या आई-वडीलांचे बाळासाहेबांवर आजही खूप प्रेम आहे. मराठी माणून म्हणून या दोघा बंधूंनी एकत्र यावे असे मला मनापासून वाटते, असे अविनाश जाधव म्हणाले.
आमचा डिएनए एकच आहे
आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. आम्ही आमचे काम सुरू केले आहे. खरंतर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा डिएनए एकच आहे. त्यामुळे जुळवून घेणे सोपे होणार आहे. यापूर्वी लोकसभेला ज्यावेळी आम्ही एकत्र आलो होतो, त्यावेळी आम्ही कार्यकर्ते एकत्र आलो होतो. मात्र त्यावेळी कार्यकर्ते नाराज होते. भाजप आणि शिंदे गटाचा प्रचार करताना आमचे कार्यकर्ते खुश नव्हते. आता आमचे जे सगळे एकत्र आले आहेत, ते केवळ कार्यकर्ते नव्हे तर, कुटूंबिय एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतील शिवसैनिकांची जी घरे आहेत, ती मुळ मराठी घरे आहेत. आता, जे आम्ही एकत्र आलोय ते कुटुंब म्हणून आलोय. यापूर्वी आम्ही आम्ही कार्यकर्ते म्हणून एकत्र आलो होतो, त्यावेळी कुटुंब सोबत नव्हते, असे जाधव म्हणाले.
आदेश दिला तर, युती करायला आवडेल
राज ठाकरे यांनी ठाण्यात युती करण्याबाबत आदेश दिला तर, आम्हाला युती करायला नक्की आवडेल. राजन विचारे मागील अडीच तीन वर्षापासून लढतायेत, त्यांनी त्यांचा पक्ष जिवंत ठेवला, अशा माणसाबरोबर काम करायला आवडेल. निष्ठा ही महत्वाची आहे. मागील काही दिवसांपासून मराठी माणूस अडचणीत आहे. हिदी सक्ती करणे असेल, मराठी माणसाला घरात घुसून मारणे असेल, आता या सगळ्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. त्यामुळे मराठी माणसासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले.