बदलापूरः मे महिन्यात पश्चिमी विक्षोभ आणि मे अखेरीसच मोसमी पावसाचे झालेले आगमन यामुळे यंदाच्या वर्षात पाच महिने पावसाळा अनुभवास आला. यंदाच्या वर्षात ११२ दिवस पाऊस पडला आहे. मे महिन्यापासून आतापर्यत ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सरासरी ३ हजार ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मुरबाड शहरात सर्वाधिक ४ हजार ३८७ मिलीमीटर तर त्याखालोखाल बदलापूर शहरात ४ हजार २६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदाच्या वर्षात भर उन्हाळ्यात पावसाला सुरूवात झाली. पश्चिमी विक्षोभामुळे ऐन उन्हाळ्यात पाऊस आणि गारवा जाणवला. मे महिन्यात अवकाळी पाऊस तीन ते चार दिवस पाऊस कोसळतो. मात्र यंदाच्या मे महिन्यात १२ ते १३ दिवस पाऊस कोसळला. त्यामुळे यंदाच्या वर्षातील पावसाचे दिवसही वाढले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे भर उन्हाळ्यात जुलै महिन्याची आठवण झाली.
ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात बदलापूर शहरात सर्वाधिक ४९५ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर इतर शहरातही सरासरी २५० मिलीमीटर पावसाची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली. त्यानंतर जून महिन्यातही चांगल पाऊस कोसळला. मोसमी पावसाची खरी नोंद जून ते सप्टेंबर या काळात केली जाते. मोसमी पावसाच्या काळात पावसाचे दिवस मोजले जातात. ज्या दिवशी सरासरी २.५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो त्या दिवसाची नोंद पावसाचा दिवस म्हणून केली जाते. यंदाच्या वर्षात जून ते सप्टेंबर या १२१ दिवसांच्या काळात १०० पावसाच्या दिवसांची नोंद झाली आहे.
गेल्या काही वर्षात ही सर्वाधिक नोंद असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. तर या जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसाची नोंद मोडक यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार बदलापूर ३७७३ मिमी, अंबरनाथ ३१०२ मिमी, कल्याण ३०७० मिमी, डोंबिवली ३२२८ मिमी, दिवा ३०३० मिमी, मुंब्रा ३३३९ मिमी, रबाळे ३२५१ मिमी, ठाणे ३२९५ मिमी, ऐरोली ३२७६ मिमी, घनसोली ३४३० मिमी, कोपरखैरणे ३४५८ मिमी, तुर्भे ३५२२ मिमी, वाशी ३०३९ मिमी, सानपाडा ३२८१ मिमी, महापे ३५५८ मिमी, नेरूळ ३५६९ मिमी, बेलापूर ३७५९ मिमी, पनवेल ३५१५ मिमी, तळोजा ३२०७ मिमी इतकी नोंद झाली आहे.
पाच महिन्यात मुरबाड सर्वाधिक
मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसात सर्वाधिक नोंद मुरबाड शहरात झाली आहे. मुरबाड येथे तब्बल ४ हजार ३८७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद आली आहे. तर त्या खालोखाल बदलापूर येथे ४ हजार २६९ मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला देला आहे. अंबरनाथ येथे ३ हजार ३९१ मिमी, कल्याण येथे ३ हजार ३३८ मिमी, डोंबिवली ३ हजार ४६२ मिमी, तर दिवा ३ हजार २२४ मिमी, ठाणे येथे ३ हजार ५५० मिमी, ऐरोली ३ हजार ५१६, कोपरखैरणे ३ हजार ७११ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.