ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीपुर्वी किमान चार स्थानकांवर मेट्रोची सेवा सुरू करण्याचा बेत सत्ताधारी महायुतीकडून आखला जात आहे. संपुर्ण प्रकल्पासाठी दोन वर्ष लागणार असणार तरी, घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांवर मेट्रो सेवा या वर्षाअखेर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
कारशेड सुरू नसले तरी एका गाडीच्या जोरावर या चार स्थानकांत प्रवासी वाहतूक करणे शक्य होणार असल्याचे दावे सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. ठाण्यात महायुतीसाठी विशेषत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे महापालिका निवडणुक महत्वाची आहे. यामुळेच ठाणे मेट्रो मार्गिकेची चाचणी लवकरात लवकर व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आग्रह धरला होता.
अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली. या संपुर्ण प्रकल्पाला महाविकास आघाडीमुळे विलंब झाला असला तरी, ठाण्यातील मेट्रो प्रकल्पातील किमान दहा स्थानके एप्रिल २०२६ तर, संपुर्ण प्रकल्पाचे काम २०२७ मध्ये होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शिंदेंनी धरला होता आग्रह
प्रकल्पाची एकंदरीत परिस्थिती पाहता किमान घोडबंदर मार्गावरील चार स्थानके सुरू करण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला आहे. यानुसार, घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली असून ही स्थानके डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. या मेट्रो स्थानकातील काही स्थापत्ये कामे अपुर्ण असून ती डिसेंबरपर्यंत उरकरण्याचे बेत आखण्यात आले आहेत.
घोडबंदर मार्गावरील स्थानके का ?
घोडबंदर मार्गावरील अजस्त्र वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामामुळे वाहतूक कोंडीचे दुखणे वाढले आहे. या मार्गावरील मेट्रो प्रकल्प हा महायुती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा आहे. गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत घोडबंदर भागातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे येथील नागरिकांचा वाहतूुक कोंडीमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी याच भागातील मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात आल्याची चर्चा आहे.
कारशेड नसली तरी मेट्रो सेवा
कारशेडचे काम होण्याच वेळ लागणार असला तरी, मेट्रो वाहतूक सेवा सुरू करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. एका गाडीच्या जोरावर मर्यादित स्थानकात मेट्रो वाहतूक सुरू होऊ शकते. नवी मुंबईत सिडकोनेही अशाचप्रकारे मेट्रो वाहतूक सेवा सुरू केली होती. त्याचप्रमाणे ठाणे मेट्रो प्रकल्पही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.
चार स्थानकांपुरती सेवा मर्यादित
घोडबंदर मार्गावरील घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांवरील प्रवासी वाहतूकीसाठी एका गाडीची सेवा पुरेशी आहे का, हा प्रश्न आहे. घोडबंदर भागातून नोकरदार वर्ग कामानिमित्त मुंबईत जातो. त्यामुळे किमान घाटकोपरपर्यंत तरी मेट्रो वाहतूक सेवा सुरू व्हावी अशी घोडबंदरवासियांची अपेक्षा आहे. असे असले तरी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चार स्थानकांमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असली तरी ती प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.