ठाणे : गेल्या चार दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा, राम मारूती रोड भागात फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. येत्या काही दिवसांत दिवाळी असल्याने नागरिकांना, वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी रात्री फेरीवाले आणि दुकानदार यांच्यामध्ये वादही झाला होता. ठाणे महापालिकेनेही या फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
येत्या काही दिवसांवर दिवाळी उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिक ठाणे बाजारपेठ, ठाणे रेल्वे स्थानक, नौपाडा, गोखले रोड, राम मारूती रोड भागात वस्तू खरेदीसाठी येत असतात. नागरिक खरेदीसाठी येत असल्याने या भागात मोठ्याप्रमाणात फेरीवाले वाढले आहेत. या भागात यापूर्वीच फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडविले असताना आता नव्या फेरीवाल्यांची भर पडत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील एलफिन्स्टन रोड स्थानकात (सध्याचे प्रभादेवी) २०१७ मध्ये एका अफवेमुळे रेल्वे पूलावर अडकून प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा विळखा असतो. ठाणे शहरात मागील चार दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा, राम मारूती रोड, गोखले रोड परिसरात फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे. या संदर्भात काही नागरिकांच्या ठाणे महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली. यामुळे संतापलेल्या काही फेरीवाल्यांनी येथील व्यापाऱ्यांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर अंतरामध्ये फेरीवाले व्यवसाय करत होते. त्यांच्यावर मंगळवारी कारवाई झाली. ही कारवाई सुरु राहणार आहे. – महेशकुमार जामनोर, साहाय्यक आयुक्त, नौपाडा -कोपरी प्रभाग समिती, ठाणे महापालिका.