ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे घोडबंदरच्या पातलीपाडा भागात दिड एकर क्षेत्रात सेंद्रीय शेती प्रकल्प उभारला आहे. नागरिकांना शेतीचे महत्त्वही समजून घेता यावे, यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असून कृषी दिनाच्या निमित्ताने हा प्रकल्प ठाणेकरांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. हा उपक्रम समजोपयोगी व्हावा यासाठी या शेतामध्ये तयार होणारी सेंद्रिय उत्पादने अनाथाश्रम व वृद्धाश्रमांना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पाच महिन्यांपुर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात ठाणे महापालिकेने वृक्षवल्ली प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागा आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे पातलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रात सेंद्रीय शेती प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम तीन महिन्यांपुर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले होते.
महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून त्याचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले. आता हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधिक्षक केदार पाटील यांनी दिली. या प्रकल्पाचे पूर्ण व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे.
सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना नैसर्गिक शेती, पिके, भाजीपाला, फळझाडे, सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासंबंधी माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच, शेतीचे महत्त्वही समजून घेता येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
प्रकल्पात काय?
या प्रकल्पात, विविध प्रकारचा भाजीपाला व पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. त्यात, वांगी, भेंडी, टोमॅटो, मका, मिरची, ढोबळी मिरची, हिरवा व लाल कोबी, भुईमूग, रताळे, सुरण, लाल माठ, मेथी, कारले, दोडका, शिराळी, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्या यांचा समावेश आहे. तसेच, दोन प्रकारचे तांदूळ, नाचणीचे उत्पादनही घेतले जात आहे.
तर, फळझाडांमध्ये आंबा, लिंबू, चायनीज लिंबू, ॲवेकॅडो, अंजीर, केळी, सिताफळ, लक्ष्मणफळ, डाळिंब, बुटका नारळ आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रकल्प क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये वॉटर लिली आणि मासे सोडण्यात आले आहेत. भविष्यात या प्रकल्पामध्ये कोंबड्या, गाई, शेळ्या, टर्की आणि बदक पालन यांचा समावेश करण्याची योजना आहे.
नागरिकांसाठी खुले
पातलीपाडा येथील महापालिकेच्या या सेंद्रिय शेती प्रकल्पास सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५. या वेळेत नागरिकांना भेट देता येईल. शाळांना विद्यार्थी भेटींचेही आयोजन करता येणार आहे, असे पालिकेने सांगितले.