उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील म्हारळ, वरप आणि कांबा या गावांची एकत्रित नगरपालिका निर्माण करण्याची मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे या गावांना सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायतींची कसरत होत असून आर्थिक अडचणीही निर्माण होत आहेत. त्यामुळे म्हारळ, वरप, कांबा यांसह अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, शहापूर तालुक्यातील आसनगाव आणि वासिंद या ग्रामपंचायतींचीही नगरपंचायत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा हा सर्वाधिक नागरिकरण होणारा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यात महामार्ग विस्तारीकरण, रस्ते रूंदीकरण इतर अनेक कामे सुरू असल्याने येथील बांधकाम क्षेत्राला झळाळी मिळाली आहे. महापालिकांच्या क्षमता संपल्याने वेशीवर असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये बांधकाम क्षेत्र विस्तारते आहे. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झपाट्याने नागरिकरण होते आहे. त्यामुळे ग्रामपंचायती क्षेत्रांमध्ये टोलेंजग इमारती उभारल्या जात आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये चाळींची संख्या वाढली आहे. या लोकसंख्येला सुविधा पुरवणे ग्रामपंचायतींना अवघड जाते आहे.
अपुरा पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न, रस्ते आणि इतर अंतर्गत सुविधा देताना ग्रामपंचायतींची कसरत होत आहे. या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थितीही नाही. त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्र विकासातही मर्यादा येत आहेत. यात कल्याण तालुक्यात असलेले आणि उल्हासनगर महापालिकेच्या वेशीवर असलेली म्हारळ, वरप, कांबा ही गावे, अंबरनाथ तालुक्यात असलेली आणि बदलापूर शहरापासून नजीक असलेले वांगणी, शहापूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील आणि आता समृद्धी महामार्गाशेजारी असलेली वासिंद आणि आसनगाव ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
त्यामुळे या ग्रामपंचायंतीना नगर पंचायती म्हणून घोषीत करण्याची मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या ग्रामपंचायतींची लोकसंख्या एक लाखांपेक्षा अधिक झाल्याचेही कथोरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
म्हारळ, वरप, कांबा एकत्रित नगरपालिका
कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असलेली म्हारळ, वरप आणि कांबा ही गावे निम्न शहरे म्हणून विकसीत होत आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या वेशीवर असलेली ही गावे आता शहरे झाली आहेत. येथे लाखो रूपयांची घरे असलेले गृहप्रकल्प विकसीत झाले आहेत. याच भागात नामांकीत शाळाही सुरू आहेत. रेल्वे, रस्ते अशी वाहतुकीची साधने असल्याने या भागात घरे घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनांना आर्थिक मर्यादा असल्याने येथे नागरी सुविधा पुरवताना अडचणी येत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.
वांगणीलाही नियोजीत विकासाची गरज
बदलापूरपुढचे स्थानक म्हणून आता वांगणीकडे पाहिले जाते आहे. येथे अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र येथे विविध समस्या वाढल्या आहेत. अतिक्रमण, बनावट दस्तऐवज, अरूंद रस्ते, पाणी आणि कचरा प्रश्न यामुळे वांगणी गावाला नियोजीत विकासाची गरज आहे. त्यामुळे वांगणीची नगर पंचायत करण्याची मागणी करण्यात येते आहे.