Rain Viral Video: गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईसह इतर शहरांना झोडपून काढलं आहे. काल हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. जोरदार पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी साचले असून रस्ते जलमय झाले होते. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आली असून कालपेक्षा आज पाऊस ओसरला आहे. पण कालच्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वेसेवा ठप्प होण्याच्या मार्गावर होती आणि अनेकांच्या घरी पाणी शिरले होते.
कालपासून या मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये अंधेरीतील एका घरात पावसाचं पाणी शिरलं आहे.
व्हायरल व्हिडीओ (Mumbai Rain Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंधेरीतील एका ठिकाणी चाळीतल्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. या पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण घराची वाईट अवस्था झाली आहे. किचनमध्येदेखील पाणी शिरलं असून या घरातली महिला तशात पाण्यात वावरताना दिसतेय. गॅस सिलेंडर, पाण्याची बादली, भांड्याची मांडणी या सगळ्याच गोष्टी पाण्याखाली गेल्या आहेत.
घरात होणारं नुकसान पाहून महिलेला अश्रू अनावर झाले आहेत. अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं असा प्रश्न तिला पडल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतोय. दरम्यान, ही घटना अंधेरीत घडली असून नेमकं ठिकाण अद्याप कळू शकलं नाही. पण महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @jyoti.gorse.16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसंच व्हिडीओला “अंधेरी मुंबईकरांचे हाल, आज सकाळी ८ वाजता मुसळधार पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जगातील सर्व संकटे आणि अडचणी फक्त आपल्या मध्यमवर्गीय लोकांवर येतात, मग तो निसर्गाचा कहर असोत किंवा सरकारचा.” तर दुसऱ्याने “परिस्थिती ज्याच्यावर येते ते त्यालाच माहीत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “ताई रडू नका सगळं ठीक होईल” तर एकाने “रडू नका हे ही दिवस जातील. संकट ण त्याच्यावरच येतात जो सहन करण्याची ताकद ठेवतो.” अशी कमेंट केली.