भाईंदर :- भाईंदरमध्ये नव्याने उभारण्यात आलेले कला दालन म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिवंत स्मारक असल्याचा भास होत असल्याची भावूक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते.
भाईंदर पश्चिमेतील गोल्डन नेस्ट परिसरात मिरा भाईंदर महापालिकेकडून बाळासाहेब ठाकरे कला दालनाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून घेतला. त्यानुसार मागील काही वर्षांपासून या कला दालनाचे काम सुरू होते.
मागील वर्षी विधानसभा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, हे काम अर्धवट असतानाच त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे, सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कला दालनाच्या अधिकृत शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच खासदार नरेश म्हसके उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शिंदे यांनी कला दालनाची सविस्तर पाहणी केली आणि पाहणीदरम्यान ते भावूक झाल्याचेही दिसून आले.यानंतर बोलताना, “हे दालन म्हणजे बाळासाहेबांचे जिवंत स्मारक आहे” असे भाष्य शिंदे यांनी केले. कला दालनात उभारण्यात आलेल्या विविध शिल्पकृती आणि वास्तूमुळे युवा पिढीला प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय, मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजवर केलेल्या सर्व विकासकामांपैकी हे काम अत्यंत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
आंदोलनकारी नगरसेवकांचा सन्मान
मिरा भाईंदर शहरात बाळासाहेब ठाकरे कला दालन उभारण्याचा निर्णय २०१९ साली घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक निधी त्या वेळी असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून मंजूर होत नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महापौर दालनात आंदोलन करून या निर्णयाला चालना देण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलानात सहभागी झालेल्या अनेक नगरसेवकांवर त्या वेळी गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली होती.
यानंतर सत्तापरिवर्तन झाले आणि मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती आल्यानंतर, त्यांनी आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कला दालनाच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.या पार्श्वभूमीवर, कला दालनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या काळी आंदोलन करून प्रकल्पाला गती देणाऱ्या आंदोलनकारी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
एकच ब्रँड म्हणजे बाळासाहेब ठाकरे
मागील काही महिन्यांपासून काही जण राज्यात स्वतःला ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रात एकच खरा ब्रँड आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.”बाकी लोक ब्रँड नाहीत, ते बँड आहेत; आणि त्यांचा बँड महाराष्ट्राची जनता वाजवेल,”अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
