छत्रपती संभाजीनगर : बीडमधील केज, धाराशिवमधील कळंब आदी परिसरात रविवारी झालेल्या पावसानंतर मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे गेट क्र. १, ३, ४, ६ या चार वक्री दरवाजे o.२५ मीटरने उघडून नदीपात्रात ३ हजार ४९४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवला किंवा कमी केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नदीपात्रात केला जात असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता प्रशासनाकडून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. जवळपास सर्वच तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आधीच धरणे भरलेली असताना पुन्हा झालेल्या मुसळधार पावसाने तेर परिसरातील तेरणा धरणाने शनिवारी रात्री रौद्र रूप धारण केले होते. तेर, रामवाडी, कोंबडवाडी, गोवर्धनवाडी येथील शेतशिवार खरडवून मोठ्या प्रमाणात माती आणि पिके वाहून गेली आहेत. गावातही पाणी शिरल्याने ग्रामस्थांच्या अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर, गोवर्धनवाडी, रामवाडी, उपळे दुमाला, कसबे तडवळे, येडशी, येरमाळा, कोंबडवाडी या गावांसह परिसरात शनिवारी सायंकाळी २०० मिलीमीटर पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची रविवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, तेरचे ग्राममंडळ अधिकारी शरद पवार, तेरचे ग्राममहसूल अधिकारी प्रशांत देशमुख उपस्थित होते. तेर येथील माऊली ट्रेडर्सच्या दुकानात ठेवलेले १०० पोते सिमेंट मुसळधार पावसामुळे भिजून नुकसान झाले असल्याचे ज्ञानदेव कुंभार यांनी सांगितले.

सर्वाधिक पाऊस परंडा तालुक्यात

परंडा तालुक्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल १०९.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पाणी प्रवाहाच्या अतिवेगामुळे शेतातील माती खरडून जावून तसेच ओढ्यातील दगडी रस्तेही वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यात ३३.९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. तुळजापूर ४३.९, भूम ४४.३, कळंब ४०.३, उमरगा ७२.०, लोहारा ४०.३, वाशी ५७.४ मिलीमीटर, अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसाचे प्रमाण ५२.४ मिलीमीटर असे आहे. आजवर अपेक्षित सरासरीच्या ९२.२ मिलीमीटर इतका पाऊस जून ते आजअखेर नोंदविला गेला आहे.

पुलावरून पाणी; धाराशिव-लातूर राज्यमार्ग बंद

तेरणा धरण परिसरात एकाच रात्रीत झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव ते लातूर हा राज्यमार्ग रूई-ढोकी येथे बंद झाला होता. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रूई-ढोकी येथील पुलावरून जवळपास चार फूट पाणी वाहत असल्यामुळे वाहनधारकांनी धोक्याची शक्यता गृहीत धरून पाण्यातून वाहने घालणे टाळले होते. दरम्यान एक चारचाकी गाडी तेरणा नदीत वाहून जात होती. मात्र तिथे उपस्थित काही तरूणांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडी पाण्याबाहेर काढली. सध्या पुलावरून पाणी ओसरल्याने मार्ग चालू झाला आहे