छत्रपती संभाजीनगर – परळी वैजनाथ येथील नगराध्यक्षपदावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. मुंडे भावंडांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘सामंजस्य-करारा’नुसार परळीचे नगराध्यक्षपद धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येऊन मागील निवडणुकीतील संख्याबळापेक्षा भाजपला नगरसेवकांच्या अधिक जागा सोडण्यात येतील, असे एक सूत्र ठरल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात थेट त्यावर कोणी स्थानिक नेता बोलत नसला तरी हे सूत्र बैठकीत ठरल्याची जोरदार चर्चा सध्या परळीत सुरू आहे.

परळीचे नगराध्यक्षपद हे राज्यात कायम चर्चेत येते. यापूर्वी गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षाची बाजू नगराध्यक्षपदाला राहिलेली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी निवडलेल्या उमेदवाराला विरोध करून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या समर्थकाला नगराध्यक्षपदावर बसवल्याचा इतिहास आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनही समोर आलेला आहे.

मागील वेळच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे समर्थक मेनकुदळे यांचा पराभव तर धनंजय मुंडे यांच्या पक्षाकडून लढणाऱ्या संजीवनी हालगे या विजयी झाल्या होत्या. मागील वेळचे नगराध्यक्षपद हे आेबीसी महिलेसाठी राखीव होते. यावेळी खुल्या वर्गातील महिलेसाठी परळीचे नगराध्यक्षपद आरक्षित असून, या निवडणुकीत राज्याप्रमाणेच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात स्थानिक पातळीवरही युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

राज्यातील आेबीसी विरुद्ध मराठा या वादाचीही किनार परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहणार असून, आेबीसींची मतपेढी खुल्या वर्गाच्या उमेदवारामागे उभी करून परळीतील प्रभाव दाखवून देण्यासाठी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे प्रतिष्ठा पणाला लावतील, असा राजकीय विश्लेषक आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. यातून राज्यातही आेबीसी एक मतपेढीचा संदेश पोहोचवला जाईल, असे मानले जात आहे.

परळीत मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे २८, भाजपचे तीन, रिपाइंचा एक व शिवसेनेचा एक नगरसेवक होता. आता १७ प्रभागातून ३५ नगरसेवक निवडून द्यायचे असून, एका प्रभागात चार सदस्य असतील, अशी प्रक्रिया आहे. तर ९ सदस्यामागे एक स्वीकृत सदस्य घेण्यात येईल, असे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे व राज्यातील मंत्री पंकजा मुंडे या दोन युतीतील नेत्यांच्या निर्णयातून जे काही ठरेल, तो निर्णय कार्यकर्त्यांना मान्य असेल. त्यानुसार आम्ही प्रचारात उतरू. नगराध्यक्षपदाचा निर्णय अंतिम चर्चेतूनच ठरेल. – बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.