छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलेले ‘ पॅकेज’ म्हणजे खोटे कथानक आहे. ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत संपूर्ण दिशाभूल करणारी असल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली. या पूर्वी दिलेली २२०० कोटींची मदत, पीक विम्याची रक्कम अशी गोळाबेरीज करण्यात आली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असून ११ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणारा मोर्चा अधिक मोठा निघेल असा दावा दानवे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीमध्ये केला.
दिलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना या मदतीचा काही एक उपयोग होणार नाही. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत हीच मुख्य आहे. ती पूर्ण करावी यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या आंदोलनास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. विम्याच्या जुन्या रकमाही मिळत नाही. त्यात नव्याने पाच हजार कोटी रुपये मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. जाहीर केलेल्या रकमा दिशाभूल करणाऱ्या असल्याची टीका दानवे यांनी केली. कर्जमाफी केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. जाहीर केलेल्या रकमेपैकी १० हजार कोटी रुपयांचा कसलाही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, असे दानवे म्हणाले.
मंत्री संजय शिरसाट यांच्या तीन चौकशा
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाने पुढे काय पाठपुरवा केला असे दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारकडून एक नाही, दोन नाही तर तीन चौकशा सुरू आहे.
कबुतर, कुत्र्यांचे निकाल लवकर लागतात
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे या अनुषंगाने सुरू असणाऱ्या सुनावणीची तारीख पुढील एक महिनाभर पुढे गेली. खरे तर या देशातील न्यायालयात कबुतराला दाणे घालावे का, याचा निकाल लवकर लागतो. भटक्या कुत्र्यांवरील याचिकेचा विचार होतो. पण राजकीय पक्षाची पळवापळवी केल्यानंतरही त्यावर निर्णय घ्यायला वेळ लागतो. यावर आम्ही न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर काय बोलणार असे दानवे म्हणाले.
मनसेबरोबर तुर्त चर्चा नाही
संभाजीनगर महापालिकेची तयारी आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत. मनसे बरोबर सध्या तरी आमचे कोणते बोलणे सुरू नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या निर्देशानुसार योग्य वेळी निवडणुका लढतानाचे निर्णय घेतले जातील, असे दानवे म्हणाले.