नवी दिल्ली : “पहलगामच्या दहशतवाद्यांचे काय झाले, ऑपरेशन सिंदूरमधून काय मिळाले, असे प्रश्न विरोधक विचारत होते. पण, त्यांना स्पष्टपणे सांगतो की, पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना सुनियोजित मोहिमेअंतर्गत ठार करण्यात आले आहे. आपल्या संरक्षण दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांच्या सूत्रधारांनाही ठार केले. मोदी सरकार दहशतवाद सहन करत नाही. हे सरकार म्हणजे मनमोहन सिंह सरकार नव्हे, ज्यांच्या काळात दहशतवाद्यांना पायघड्या घालून बोलवले जात होते,” असा घणाघाती शाब्दिक हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
लोकसभेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’वर होत असलेल्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी प्रामुख्याने अमित शहांना लक्ष्य केले होते. त्याला शहांनी मंगळवारी सभागृहात आक्रमकपणे उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ची तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण माहिती शहांनी दिली. आपल्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईचा विरोधकांना आनंद का होत नाही, असा आरोपवजा प्रश्न शहा यांनी केला.
लोकसभेतील सव्वा तासाच्या भाषणामध्ये शहांनी काँग्रेसच्या दहशतवादविरोधी धोरणावर टीका केली. “माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम दहशतवादी पाकिस्तानमधून आले याचा काय पुरावा आहे असे म्हणत आहेत. ते पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.ते पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत,” असा आरोप शहा यांनी केला.
काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना मोकळे रान दिले गेले. मोदी सरकारने मात्र प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. उरी, पुलवामा हल्ल्यानंतर आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली होती. पहलगामच्या वेळी आपण थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. या कारवाईमुळे पाकिस्तान शरण आले. त्यानंतर आम्ही पाकिस्तानविरोधातील संघर्ष थांबवला. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
नेहरू, गांधी कुटुंब पुन्हा लक्ष्य
पाकिस्तानची निर्मिती ही काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची घोडचूक होती. फाळणी मान्य केली नसती तर पाकिस्तान निर्माणच झाला नसता. भारताला दहशतवादाला सातत्याने सामोरे जावे लागते त्याला पं. नेहरू जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शहांनी केला. नेहरूंनी १९४८मध्ये एकतर्फी शस्त्रसंधी केल्यामुळे पाकव्यप्त काश्मीर निर्माण झाले. १९७१मध्ये सिमला करार करताना इंदिरा गांधी पाकव्याप्त काश्मीर घेण्याचे विसरून गेल्या. १९६२मध्ये नेहरूंनी चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये सदस्यत्व मिळवून दिले. नेहरू, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना चीनचा पुळका येतो. चीनने लडाखमध्ये भारतीय जवानांविरोधात संघर्ष केला तेव्हा ‘राजीव गांधी फाउंडेशन’च्या माध्यमातून राहुल गांधी चीनच्या राजदुतांशी भेट घेत होते. गांधी कुटुंबाला चीनवर अधिक प्रेम आहे, या आरोपांची शहा यांनी पुनरुच्चार केला.
काँग्रेसच जबाबदार!
देशातील वाढत्या दहशतवाला काँग्रेसचे सरकार जबाबदार असल्याचाही आरोप शहांनी केला. २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकार केंद्रात सत्तेत आल्यावर काँग्रेसने दहशतवादविरोधी पोटा कायदा रद्द केला. त्याचा परिणाम २००५ ते २०११ या ६ वर्षांमध्ये २७ दहशतवादी हल्ले केले गेले. या हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना जीव गमावावा लागला. पोटा रद्द केल्यानंतरच दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली. या दहशतावदी हल्ल्याविरोधात काँग्रेसने काय केले याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी उत्तर द्यावे, असे आवाहन शहा यांनी दिले. मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ले झाले ते काश्मीरपुरते सीमित होते असेही ते म्हणाले.