Pratibha Pawar And Revati Sule Viral Video: राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असून, प्रचाराने आता जोर धरला आहे. यावेळी राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्यासमोर त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. एककीकडे अनुभवी अजित पवार असले तरी नवख्या युगेंद्र पवार यांच्यामागे शरद पवार असल्यामुळे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असून. त्यात दावा करण्यात येत आहे की, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. सध्या सोशल मीडियावर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनीही माध्यमांशी बोलताना प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणावर बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीमध्ये असलेले टेक्सटाईल पार्क, शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाले. आता याच टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नीला अर्धा तास रोखून ठेवले. हे दुर्दैवी आहे.”

लोकसभेनंतर विधानसभेतही पवार कुटुंबीय आमने-सामने

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून सुप्रिया सुळे मैदानात होत्या. त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. आता विधानसभा निवडणुकीतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेतही पवार कुटुंबीय आमने-सामने आले आहेत. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे ही पाहा: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!

राष्ट्रवादीत फूट

जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह सुमारे ४० आमदार महायुतीला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढला. पण त्यांनी लढवलेल्या चार जागांपैकी एकाच जागेवर विजय मिळवता आला. दुसरीकडे शरद पवार यांनी पक्षात राहीलेल्या काही मोजक्या नेत्यांना बरोबर घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratibha pawar stopped from entering baramati textile park video goes viral supriya sule ajit pawar sharad pawar aam