या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ शकते. महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूकही चर्चेत असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष फुटले आहेत. तसंच लोकसभा निवडणुकीचा निकाल काय आणि कसा लागतो याचाही परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागल्यानंतर या निवडणुकीची तयारी सुरु होईल. २०१९ मध्ये निवडणूक होती तेव्हा प्रचारा दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन हे वाक्य गाजलं होतं. २०२४ ची विधानसभा निवडणूक पार पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येतील का? याचं उत्तर त्यांनी दिलं आहे.
लोकसभेच्या प्रचारात व्यग्र
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचारसभांमध्ये चांगलेच व्यग्र आहेत. उद्धव ठाकरेंवर ते टीकाही करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेही देवेंद्र फडणवीस आणि भाजपा तसंच मोदींवर टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे कागदी वाघ आहेत त्यांनी आम्हाला पाकिस्तानला उत्तर कसं द्यायचं वगैरे शिकवू नये असंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे कागदी वाघ
“उद्धव ठाकरे हे कागदी वाघ आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकही आंदोलन केलं नाही. कधी तुरुंगात गेले नाहीत. कधीही कुठल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसंच आयुष्यात त्यांनी घोषणाही दिलेल्या नाहीत. आता ते आम्हाला डरपोक म्हणत आहेत. आपल्या देशात पंतप्रधान मोदी असे आहेत ज्यांनी दाखवून दिलं की पाकिस्तानला घरात घुसून मारु शकतो. आता उद्धव ठाकरे ज्यांनी आयुष्यात डासही मारलेला नाही ते आम्हाला पाकिस्तानबाबत सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले असते तर आम्ही ऐकलं असतं. मात्र मच्छरही ज्यांनी मारला नाही त्यांचं आम्ही कशाला ऐकू. तसंच चीन वगैरे बद्दल तर त्यांना काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. त्यांना परराष्ट्र धोरण, जिओ पॉलिटिक्स यातलं काही कळत नाही. काँग्रेससह ते बसले आहेत. त्या काँग्रेसने हजारो एकर जमीन चीनला दिली आहे. तर मोदींनी एक इंच जमीन चीनला मिळू दिलेली नाही. आपल्या देशाच्या इतिहासात डोकलाममध्ये आपण चीन सैनिकांना रोखलं आहे. चीनकडून पैसे घेऊन पक्ष चालवणारे जे आहेत त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं आहे. तसंच पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावरही उत्तर दिलं आहे.
मतांसाठी इंडिया आघाडीचा व्होट जिहाद
काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी मशिदींमधून मतं मागितली जात आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. उमेदवारांची नावं सांगितली जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत. हे कुठल्या प्रकारचं सेक्युलॅरिझम आहे? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. जर या प्रकारे ध्रुवीकरण करुन व्होट जिहाद होतो आहे असाही गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार का?
येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार का? हा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाला मुख्यमंत्री करायचं हा निर्णय आमचा पक्ष घेतो. अगदी मनापासून सांगतो की कुणाची काय इच्छा आहे? त्या पदाची इच्छा आहे, या पदाची इच्छा आहे असं इच्छा बाळगून काही होत नाही. जे इच्छा बाळगतात ते दुःखी होतात. जे वास्तव स्वीकारतात ते राजकारण करतात. मी वास्तवदर्शी राजकारण करणारा माणूस आहे. पक्ष जी जबाबदारी मला देईल ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.” असं सूचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.