सांगली : फायदा होणार असेल तर युती, अन्यथा स्वबळाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, उपाध्यक्ष विष्णू माने, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राजेंद्र देशमुख, तमणगोंडा रविपाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष पवार यांनी ज्या ठिकाणी फायदा होऊन सत्तेत चांगला वाटा मिळणार आहे, अशा ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांशी युती करावी.
ज्या ठिकाणी अधिकाधिक जागा मिळण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी स्वबळाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे सांगितले. यावेळी महापालिकेसह नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती बाबतची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतली. यानंतर त्यांनी महायुतीतील घटक पक्षांशी युती करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे, यावर पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान विटा, तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती भाजपने सुरू केल्या आहेत. पक्षाचे ग्रामीण प्रभारी आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी इच्छुकांशी उमेदवारीबाबत चर्चा केली.
विटा येथे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही इच्छुकांच्या मुलाखतीवेळी उपस्थित होते. विटा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासह २७ जागांसाठी ७२ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तासगाव नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याची रणनीती निश्चित केली असून, इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतले.
