Gopinath Munde: वैद्यनाथच्या व्यवहारानंतर परळीतील मुंडे समर्थक आणि उस उत्पादकांना भावनिक धक्का बसला. या निमित्ताने एक प्रश्न मात्र विचारला जातो आहे, ‘भाजप नेत्यांना साखर कारखाने चालवता येत नाहीत का ?
शरद पवार यांना विरोध हे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचे मूळ इंजिन. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संस्थात्मक राजकारणात भाजपला कधीच पुढचे पाऊल टाकता आले नाही.तो प्रयत्न करणारे भाजपमधील एकमेव नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. त्यांनी उभारलेल्यावैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना घरघर लागली. शेवटी ओंकार प्रा. लि. या साखर कारखान्याला तो १३१ कोटी ९८ लाख रुपयांत विक्री करण्यात आला. आता राज्यातील २०२ नोंदणीकृत कारखान्यांपैकी १०५ कारखाने सहकारी आहेत. त्यातील २५ कारखाने भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आले आहेत. १०१ कारखाने आता खासगी उद्योजक चालवत आहेत.
ओंकार परिवाराचे अध्यक्ष बाबुरावबोत्रे पाटील यांनी नवा कारखाना विकत घेतला आणि खासगीची संख्या एकने वाढली.या व्यवहारानंतर परळीतील मुंडे समर्थक आणि उस उत्पादकांना भावनिक धक्का बसला.निमित्ताने एक प्रश्न मात्र विचारला जातो आहे, ‘भाजप नेत्यांना साखर कारखाने चालवता येत नाहीत का ? ‘गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर हरिभाऊ बागडे वगळता एकाही नेत्यास साखरेच्या गोडीतून मतदारसंघ बांधता आले नाहीत.
महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनावर वर्चस्व हवे अशी मांडणी भाजप धुरिणांमध्ये सुरू झाली होती. याच काळात अटल बिहारी वाजपेयी यांचे केंद्रात १३ दिवसाचे सरकार आले तेवढ्या बेचक्यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांना मंजुरी मिळाली. एका सभासदामागे सरकारचे भांडवल पाचपट अशी रचना होती. १९९९ मध्ये या कारखान्याचा पहिला चाचणी हंगाम झाला. तत्पूर्वी साखर कारखाना निघणार याचे परळी परिसरात कोण कौतुक. कारण या परिसरात डी. एन.पाटील संस्थापक असणारा अंबाजोगाई कारखाना पुढे बाबुराव आडसकर यांनी ताब्यात घेतला. पण शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी लागणारा वेळ अधिक होता. १९९५मध्ये पहिल्या युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथची उभारणी करण्यास वेग दिला होता. लोकांमध्ये त्यांच्याविषयी कमालीचा विश्वास वाटत होता.
पहिल्याच वर्षी २२ कोटींचा फायदा गोपीनाथ मुंडेंमुळे
या काळात पांगरी आणि कौठळी या दोन गावातील शेतकऱ्यांनी १५० एकर जमीन कारखाना उभारणीसाठीदिली. जे शेतकरी जमीन देतील, त्यांच्या मुलांना कायमस्वरुपी नोकरी मिळेल असे आश्वासन होते. वैद्यनाथची उभारणी झाली तेव्हा या गावातील बहुतेकांना नोकरी मिळाली. तत्पूर्वी राज्यातील ३० नागरी बँकांनी ग्रामीण भागात साखर कारखाना उभे करण्यासाठी कर्जाची सोय केली होती. १८.१९ लाख रुपयांचे कर्ज आणि साडेसात हजार शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन समभाग विकत घेतले. आपल्या मालकीचा कारखाना उभा राहतो म्हणून शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. या कारखान्यातून चाचणी हंगामात दोन लाख टन उसाचे गाळप झाले. पहिल्याच वर्षी कारखान्याला २२ कोटी ५० लाख रुपयांचा फायदा झाला. त्याचे सारे श्रेय गोपीनाथ मुंडे यांचे. त्यांचे विमान संभाजीनगरच्या विमानतळावर उतरले की, साखर कारखान्यात बैठकांची तयारी सुरू व्हायची. मग रात्रीचे १२ वाजले तरी बैठक होईच.
सहवीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पातून पुढे कारखाना चालवता येतो, असे लक्षात आले आणि मग एकामागे एक आजारी कारखाने विकत घेण्याचे प्रयोग गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सारे व्यवस्थित सुरू होते. याच काळात वैद्यनाथमधील चांगल्या अनुभवावर मुंडे यांनी पारनेर, जगदंबा, यवतमाळ व धुळे येथील कारखान्यांसह १० – १२ कारखाने चालवायला हाती घेतले. या कारखान्यातील ऊस उत्पादकांची देणी, कामगारांची देणी, याचा भार वैद्यनाथवर पडू लागला. परिणामी अन्य आजारी कारखान्यांबरोबर वैद्यनाथचे दुखणे वाढले. २०१४ पर्यंत तो आर्थिकदृष्ट्या खंगलाच होता . तत्पूर्वी २०१२ आणि नंतर २०१५ मध्ये दुष्काळ आला. ऊस उत्पादकांनी पीक घेणे कमी केले. याच काळात या कारखान्याला दुष्ट अर्थचक्रातून बाहेर काढण्याच्या हालचाली झाल्या. पण कर्ज, त्यावरील व्याज वाढत गेले.
पंकजा मुंडेंवर कारखान्याची घडी बसवण्याची जबाबदारी
मुंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि वैद्यनाथची घडी बसवण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर आली. या काळात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद कमालीचे टोकाला गेलेले होते. कारखाना व्यवस्थापनातील अनुभव शुन्यता आणि सहकारातील माणसं हाताळण्याची पद्धत नव्या पिढीपर्यंत नीटपणे पोहचली नाही. पण तीच पद्धत लातूरमध्ये रुजली. अमित देशमुख यांनी खासगी कारखानेही काढले आणि सहकारही जपला. ‘वैद्यनाथ’ मध्ये कारखान्यातील उसाच्या रस तापविण्याची एक टाकी फुटली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. ते घसरणीचे टोक होते असे सांगतात. पुढे कारखाना सुरू करण्याचे सारे बळ पुढे एकवटले तरी त्याला फारसे यश मिळाले नाही.याच काळात वस्तू सेवा कराची नोटीसही बजावण्यात आली. पंकजा मुंडे या काळात राज्यातील भाजप नेत्यांच्या ‘ नावडत्या’ वर्गात होत्या.
२०१४ नंतर लाभार्थी मतदार बनविण्याच्या प्रक्रियेला भाजपने गती दिली होती. महिलांचीस्वतंत्र मतपेढी निर्माणाधिन होती. याच काळात साखर धंद्यातील कॉंग्रेस आणि शरद पवार समर्थकांना ‘किती साखरमाया जमवली, या अर्थाचा प्रश्न केंद्रीय संस्था आणि अंमलबजावणी संचालनालय विचारत होते. सहकारात घातलेले घोळ चव्हाट्यावर येऊ नयेत आणि आपल्या कारखान्यांना संरक्षण मिळावे म्हणून राज्यातील बहुतांश कारखांनदार आता भाजपच्या मांडवात दाखल झालेले असताना ‘ वैद्यनाथ’ साखर कारखान्याची विक्री राज्यकर्त्यांना थांबवता आली नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवरही प्रश्नचिन्ह लावले जात आहे. विक्री प्रक्रियेतील ओंकार साखर कारखान्याने वैद्यनाथ विकत घेताना सागर मार्तंड यांना अधिकार दिले असले तरी हा कारखाना खरेदी करणारे बाबुराव बोत्रे पाटील यांचे नाव मात्र सध्या परळी परिसरात चर्चेत आहे. ओंकार साखर प्रा. लिमिटेड परिवाराचे अध्यक्ष बोत्रे पाटील यांनी राज्यातीलआजारी साखर कारखाने खरेदी करण्याचा सपाटा लावल्याची चर्चा साखर उद्योगात सुरूआहे. अलिकडेच अतिवृष्टीची मदत देण्यासाठी त्यांचे एक छायाचित्र प्रकाशित झाले आहे त्यात ते एक कोटी रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना देत आहेत आणि शेजारी पंकजा मुंडे याही दिसत आहेत.
गोपीनाथ मुंडेंनी उभारलेले रोपटे भांडवलदारांच्या हाती
युनियन बँकेच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ साखर कारखान्यास डोंबिवली नागरी सहकारी बँक, आयडीबीआय आणि एनएसडीसी या बँकांनी दिलेले कर्ज थकित झाले. बँकेचीरक्कम वसूल करण्यासाठी सरफेसी कायद्यानुसार संपत्ती जप्त करण्याची परवानगीघेण्यात आली. कायद्याच्या कलम ८ आणि ९ रोजी लिलावाच्या नोटिसा काढण्यातआल्या. पण लिलावासाठी कोणी पुढे आले नाही. साखर कारखान्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ओंकार कारखान्याने दिलेल्या प्रस्तावानुसार १३१ कोटी ९८ लाख रुपयांनाकारखाना विक्री करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३२ कोटी ९९ लाख रुपये ५० हजार रुपये अशी एकूण व्यवहाराच्या २५ टक्के रक्कम भरुन घेण्यात आली. पुढे ७५ टक्केरक्कम भरण्यासाठी ओंकार साखर कारखान्याने वेळ वाढवून घेतला. त्याची अधिकचीनऊ टक्के व्याजाची रक्कमही बँकेने कारखाना विक्रीपूर्वी घेतली आहे. १३१ कोटी ९८लाखांवर ६१ लाख रुपयांचे व्याजही बँकेने विक्री व्यवहारात मिळवले.
अर्थच एवढाच की साखरेच्या राजकारणाला छेद देण्यासाठी भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांनीउभारलेले रोपटे आता मुळासकट भांडलदारांच्या हातात देण्यात आले आहे. साखर कारखानदारांच्या विरोधात उसतोडणी कामगारांची मोट बांधणाऱ्या नेत्याच्या राजकारणाऐवजी लाभार्थी मतदाराचे प्रारुप अधिक सोयीचे असल्याने वैद्यनाथ विक्रीवर भाजपमधून आता कोणी हळहळही व्यक्त करत नाही. एरवी छोट्याशा गोष्टीवर प्रतिक्रिया देणारी भाजपची मंडळींचे मौन भुवया उंचवायला लावणारे आहे.