नांदेड : नांदेड आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधितांना सहा वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या धर्तीवर विशेष मदत करावी, अशी मागणी सत्ताधारी महायुतीतील खासदार अशोक चव्हाण यांच्यासह बहुसंख्य आमदारांनी शासनाकडे केली होती; पण फडणवीस सरकारने त्या मागणीस नकार दिला, तरी अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याला साथ देण्यासाठी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील आणि तेथील काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यातील ऑगस्टअखेरपर्यंतची अतिवृष्टी आणि पुरानंतर झालेल्या नुकसानीच्या भरपाईबद्दल राज्यशासनाने साडेपाचशे कोटी रूपये मागील आठवड्यात मंजूर केले होते. जिल्हा प्रशासनाने पाठविलेला नुकसानीचा अहवाल जशास तसा स्वीकारून शासनाने मदतीसंदर्भातील आदेश जारी केला. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला. कोल्हापूर-सांगली या जिल्ह्यांना करण्यात आलेल्या मदतीच्या शासन निर्णयाचा मोठा गाजावाजा झाला; पण तो मराठवाड्यात लागू झाला नाही. असे असले, तरी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वप्रथम कोल्हापूर जिल्हा पुढे आला आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तुंसह इतर साहित्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन बुधवारी केले. त्यानुसार २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान सर्व मदतसाहित्य कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा केले जाणार असून २९ सप्टेंबरला कोल्हापूरकरांची मदत मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागात पाठविली जाणार आहे. यानिमित्ताने आ.पाटील यांनी कोल्हापूरवासीयांना साद घालताना ‘मराठवाड्याला साथ देऊया’ असे आवाहन केले आहे.