दापोली – वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, उद्योजक प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाला.
गेल्या काही दिवसांपूर्वी मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट देत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव भाजपात मंगळवार दिनांक १९ रोजी प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली.
यानुसार मंगळवारी प्रशांत यादव शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांसमवेत भर पावसात चिपळूणहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सुरुवातीला वालोपे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात केली आणि नव्या राजकीय वाटचालीसाठी देवीला साकडे घातले. यावेळी सोबत सौ. स्वप्ना यादव यांच्यासह चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण उपस्थित होत्या. नंतर प्रशांत यादव यांच्यासह शेकडो गाड्यांचा ताफा कार्यकर्त्यांसमवेत मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
प्रशांत यादव आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी प्रशांत यादव व सौ स्वप्ना यादव यांचे भाजपात स्वागत केले. यानंतर शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, जि. प. माजी बांधकाम सभापती विजयराव देसाई, माजी जि. प. सदस्य दीप्ती महाडिक, माजी उपसभापती अनंत हरेकर, अनिल चव्हाण, मुग्धा जागुष्टे, माजी सभापती सुभाष नलावडे, माजी पं. स. सदस्य सुनील तटकरे, रघुनाथ ठसाळे, युवा विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, पाचाडचे माजी सरपंच अनिल चिले, अल्पसंख्यक सेलचे अन्वर जबले, श्री.कुवळेकर, पिंपळीचे माजी सरपंच सुनील देवरुखकर, शशिकांत साळवी, जनार्दन पवार, अर्बन बँकेचे संचालक निलेश भुरण यांच्यासह ४ माजी जि. प. सदस्य, ६ मा.पं. स. सदस्य, ३ उद्योजक, ३ डॉक्टर, ९ वकील १७ सरपंच, विविध सेलचे पदाधिकारी २४ ग्रा.प. सदस्य असे जवळ जवळ दोन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, सरचिटणीस विनोद भोबस्कर, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, अमोल भोबस्कर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात भाजपची ताकद वाढत आहे – मंत्री नीतेश राणे
मंत्री नीतेश राणे यांनी या सोहळ्यात बोलताना, “प्रशांत यादव हे तळागाळाशी जोडलेले नेतृत्व आहे. त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवली. आता त्यांनी भाजपकडे वळून कोकणात आमची ताकद आणखी वाढविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातून भाजप गावागावात पोहोचेल याचा विश्वास आहे,” असे सांगितले.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – रवींद्र चव्हाण
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात, “प्रशांत यादव हे आमचे मित्र असून त्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा राहील. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गावागावात पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रित करायचे आहे. यादव यांचा विश्वास तुटणार नाही याची ग्वाही आम्ही देतो,” असे स्पष्ट केले.