सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रशासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवारी ओरोस सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी हे पाऊल उचलले.
या आंदोलनात कोकण रेल्वेच्या गाड्यांना अपुरे थांबे देणे, स्थानिक प्रवाशांना दुय्यम वागणूक, अपुरी आरक्षण सुविधा, वाढते दर आणि स्थानिक मागण्यांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, मात्र त्या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्याने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी सांगितले की, “ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर ती आमच्या हक्काची आहे. जर आज आम्ही आवाज उठवला नाही, तर उद्या तो पूर्णपणे दडपला जाईल. आम्ही कोणतीही सवलत मागत नसून, आमच्या अधिकारांची मागणी करत आहोत.”
आंदोलनात समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्यासह नंदन वेंगुर्लेकर, कसाल सरपंच राजन परब, परशुराम परब, जयद्रथ परब, सुरेश सावंत, संतोष राणे, बाळा सातार्डेकर, संजय वालावलकर, अजय मयेकर, किशोर जैतापकर, नागेश ओरोसकर आणि शुभम परब आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.