Maharashtra News Updates, 30 September 2025 : गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाचा जोर आता राज्यातील काही भागांमध्ये ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम असेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे व साताऱ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळेल.
दरम्यान, आज (३० सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरकारकडून काय मदत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या बाजूला, सरकार जी काही मदत जाहीर करेल ती दिवाळीपूर्वी मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
निवडणुका असत्या तर महाराष्ट्रात पैशाचा पूर आला असता : ठाकरे गट
शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या नुकसानभरपाईवरून शिवसेनेने (ठाकरे) राज्य सरकारला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात आत्ता निवडणुका असत्या तर मदतीसाठी केंद्राकडून व राज्य सरकारकडून पैशांचा पूर आला असता”, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तर, “महाराष्ट्रावर आभाळ फाटलं आहे, राज्य सरकारने खजिन्याची खिडकी उघडावी”, अशी मागणी ठाकरे गटाने दैनिक सामना या त्यांच्या मुखपत्राद्वारे केली आहे.