छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त मराठा मतांच्या आधारे मतपेढी होत नाही, असे सांगणारे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय मोर्चाचे शुक्रवारी नेतृत्व केले. या आंदोलनातील घडामोडींमुळे मराठा-ओबीसी वादाची धार काही प्रमाणात कमी होईल, असा दावा केला जात आहे.
बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, राजेभाऊ फड, विजयसिंह बांगर आदी नेत्यांसह संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व महादेव मुंडे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी मराठा आणि वंजारी समाजातील नागरिकही एकत्र आले होते. यावेळी आठ दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास बीड जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या मेळाव्यात मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेतून महादेव मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले.
बीड जिल्ह्यात गतवर्षीच्या दोन्ही प्रमुख निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटलेला होता. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांकडेही जातीय अंगातून पाहिले गेले आणि त्याचे संदेश समाजमाध्यमावरून पसरवण्यात आले होते. गावागावांत होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्येही कीर्तनासाठी निमंत्रित करण्यात येणाऱ्या महाराजांच्या नावांचाही जातीय अंगाने पाहण्याचे संदेशही पाठवण्यात आले होते. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाचे आंदोलनही जातीय म्हणून पाहिले गेल्याने ओबीसी समाज एकवटला होता.
मनोज जरांगे ओबीसी-मराठा समुदायात पडलेली दरी कमी करण्यासाठी महादेव मुंडे प्रकरण हाती घेतले असल्याचा संदेश जरांगे समर्थकांकडून दिला जाऊ लागला आहे. दरम्यान, महादेव मुंडे प्रकरणात मराठा समाज मोठा भाऊ म्हणून भूमिका बजावेल, अशी भाषणे या आंदोलनात करण्यात आली.