शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. एकीकडे, विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा शिंदे गटाने ताबा घेतला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आमदार, पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियमानुसार जे काही असेल ते आम्ही ताब्यात घेऊ असं विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. यावर विनायक राऊत म्हणाले, “ताब्यात घेण्यासाठी अशाप्रकारची पळवापळवी आणि चोरी असे जे प्रकार सुरू आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सनदशीर मार्गाने कमावावं आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीचं जे आहे त्यावर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपले बाप सुद्धा बदलले. काल-परवापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे पिता होते, आता तर अमित शहा त्यांना आता वडिलांसारखे वाटायला लागले आहेत. त्यामुळे हे बाप बदलायचं, नाव बदलायचं, झेंडा बदलायचा, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं. ही अशा बदमाश लोकांची अवलाद आहे.”

हेही वाचा – “अमित शहा हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू ” ठाकरे गटाचे टीकास्र!

याशिवाय, “आता महाराष्ट्रात भाजपाच्या माध्यमातून चोरांची चोरी करण्यास सुरुवात झाली आहे. खूप मोठ्याप्रमाणावर सर्वकाही चोरी करून आपल्या घरी नेण्यासाठी हे लुटारू काम करत आहेत. परंतु आम्ही घाबरणारे नाही. आमचे शिवसैनिक सर्वच्या सर्व कोट्यवधींच्या संख्येने उद्धव ठाकरेंच्यासोबत आहेत. आजही शिवसेनेचे महाराष्ट्रामधील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख इथे शिवसेना भवनात बैठकीसाठी आले आहेत. आम्ही या चोरांना त्यांची जागा दाखवून देऊ.” असंही यावेळी विनायक राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा – “…अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे” संजय राऊतांवर टीका करत संदीप देशपांडेचं विधान!

याचबरोबर “सर्वोच्च न्यायालयात आम्ही आज याचिका दाखल केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे उद्या, परवा दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालय यावर नक्कीच सुनावणी घेईल.” असं विनायक राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now chief minister eknath shinde has also changed his father vinayak raut statement in front of the media msr