scorecardresearch

“अमित शहा हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू ” ठाकरे गटाचे टीकास्र!

“ शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भाजपाची कमळी…” , असंही म्हटलं आहे.

amit shah and Uddhav Thakrey
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच आज ठाकरे गटाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपावर टीकास्र सोडलं आहे.

“निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही? मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले. हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही. न्याय झाला नाही व निकाल विकत घेतला. व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसरे काय होणार? लढाई सुरूच राहील!” असं सामानाच्या अग्रलेखाद्वारे म्हटलं गेलं आहे.

हेही वाचा – “…अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे” संजय राऊतांवर टीका करत संदीप देशपांडेचं विधान!

याचबरोबर, “शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठाकऱ्यांनी निर्माण केलेली, जोपासलेली शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हातात दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळय़ांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल.” असा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा – “ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!

याशिवाय, “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्याच्या मुळावर आलेल्या प्रत्येक ‘शाहय़ां’चा कोथळा छत्रपती व त्यांच्या मावळय़ांनी काढला. छत्रपतींचा तोच विचार घेऊन महाराष्ट्र आजही जिवंत, धगधगत आहे. बेइमान व गद्दारांना शिवाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली हा इतिहास कुणालाच विसरता येत नाही. त्याच शिवरायांचा वारसा शिवसेना सांगते. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. 40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले. मग लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पुढय़ात त्यांची पाठवली, त्यांना किंमत नाही? शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची डोकी मोजून धनुष्यबाण व पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी आहे. ठाकऱ्यांच्या नावावर त्यांना मते मिळाली. उद्याही ती मिळतीलच व पुन्हा हे लोक निवडून येतीलच अशी खात्री नसताना त्या बाजारबुणग्यांच्या भरवशावर शिवसेना व धनुष्यबाणाचे भविष्य ठरवण्यात आले. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम बनल्याचेच हे लक्षण आहे. बेइमान आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल थांबवायला हवा होता.” असंदेखील म्हटलं गेलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 07:52 IST
ताज्या बातम्या