सातारा : खासदार उदयनराजेसमर्थक भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी पालिका निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना सातारा पालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करून भाजपला पक्षांतर्गत आव्हान उभे केले आहे.
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत सोमवारी होती. महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत डावपेच आखले होते. सुवर्णा पाटील यांना भाजपने नगरसेवकपदाची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला.
भाजपकडून उमेदवारी नाकारली गेलेल्या सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्याशी विचारविनिमय करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्याचे ठरवले.
या वेळी काँग्रेसचे बाबासाहेब कदम, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दत्तात्रय धनावडे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार म्हणून सुवर्णा पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
खासदार उदयनराजे भोसले व राजघराण्याशी एकनिष्ठ असलेले संग्राम बर्गे, अक्षय मतकर, संजय पाटील, सागर पावशे, विनोद मोरे, प्रशांत आहेरराव, रवी माने तर महिलांमधून शिवानीताई कळसकर, अनिता जगताप व सुवर्णा पाटील यांची उमेदवारी निश्चित असताना त्यांना उमेदवारी मिळाली नाही. हे सर्वजण निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. त्यापैकी सुवर्णा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विनोद मोरे, शिवानीताई कळसकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनिता जगताप यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली नाही ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे खा.उदयनराजे समर्थकांसह शिवेंद्रराजेंच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान आजच्या या घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी पालिका निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना सातारा पालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करून भाजपला पक्षांतर्गत आव्हान उभे केले आहे.
