Supriya Sule On Ravi Rana : विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांचे सध्या सभा, मेळावे, मतदारसंघाचे दौरे सुरु आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, या योजनेबाबत बोलताना आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका विधानानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

“निवडणुकीत मला मत रुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे. “तू १५०० रुपये परत घेऊनच दाखव, मग बघते तुझा काय कार्यक्रम करायचा ते”, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी इशारा दिला आहे.

हेही वाचा : Supriya Sule : “मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा माझ्या पतीला…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“सत्तेत असलेल्या भावांची भाषणं आपण ऐकले तर त्यांना वाटतं की आजकालची नाती काय अशीच पळतात. पंधराशे रुपये दिले की नवीन बहीणी. पण पंधराशे रुपये दिले म्हणून या राज्यातील महिला त्यांना पाठिंबा देतील असं होणार नाही. या राज्यातील महिला या स्वाभिमानी आहेत. आम्ही महिला कष्ट करू, स्वत:च्या पायांवर उभं राहू आणि आमच्या भावांना साथ देऊ. आम्ही आमच्या भावांना कधीही रस्त्यावर सोडणार नाहीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सभेत ऐकवला रवी राणा आणि महेश शिंदेंच्या विधानाचा व्हिडीओ

खासदार सुप्रिया सुळे यांची पंढरपूरमध्ये आज सभा पार पडली. यावेळी सभेत बोलताना त्यांनी रवी राणा आणि महेश शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेचा व्हिडीओ ऐकवला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आता ते महेश शिंदे म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरनंतर पैसे मिळणार नाहीत आणि आमदार रवी राणा म्हणत आहेत की मतदान केलं नाही तर आम्ही पैसे हिसकावून घेऊ. मग ही कुठली संस्कृती आहे. आपण अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देणार आहोत का?”, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे यांचा रवी राणांना इशारा

“बहीण माहेर सोडून जेव्हा सासरी जाते, तेव्हा आमच्या बहिणीला नीट सांभाळा, असं सांगणारा भाऊच असतो. मात्र, तोच भाऊ आज मत दिलं नाही तर पैसे परत घेण्याची धमकी देतो. मग आम्ही बहिणी परवडल्या. आम्ही भावांनी दिलेल्या प्रेमावर खूश असतो. आता १५०० रुपये परत घेणाऱ्या भावाला मला खूप आदराने सांगायचं आहे. महाराष्ट्रातील लेकीला १५०० रुपये परत घेईल अशी धमकी जर दिली ना तर तू पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते तुझा काय कार्यक्रम करते”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी रवी राणा (Ravi Rana) यांना दिला.