अलिबाग – सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेण्‍याबाबत निवडणूक आयोग आणि राज्‍य सरकारने वेगाने पावले टाकायला सुरूवात केली आहे. जिल्‍हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी मतदार याद्या अंतिम करण्‍याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्‍यामुळे राजकीय पक्ष आणि इच्‍छुक उमेदवार सतर्क झाले आहेत. मात्र पंचायत समिती आणि जिल्‍हा परीषद मतदार संघांचे आरक्षण कधी जाहीर होणार याची सर्वांनाच उत्‍सुकता लागून राहिली आहे.

राज्‍यात जिल्‍हा परीषद आणि पंचायत समितीच्‍या निवडणूका तीन वर्षे रखडल्‍या आहेत.2022 मध्‍ये या निवडणूका होणे अपेक्षित होते.परंतु वेगवेगळया कारणामुळे त्‍या होवू शकल्‍या नाहीत. सर्वोच्‍च न्‍यायालयाने रखडलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका 31 जानेवारी पर्यंत घ्‍या असे स्‍पष्‍ट आदेश नुकतेच दिले आहेत.

त्‍यानंतर राज्‍य स्‍तरावर हालचालींना वेग आला आहे.राज्‍यातील जिल्‍हा परीषदांच्‍या अध्‍यक्षपदांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. मंगळवारी मतदार याद्या निश्चित करण्‍याचा कार्यक्रम देखील निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्‍यानुसार 27 ऑक्‍टोबरपर्यंत अंतिम मतदार याद्या प्रसिदध होणार आहेत.

त्‍यामुळे जिल्‍हा परीषद पंचायत समिती निवडणूका कधीही जाहीर होवू शकतात अशी स्थिती आहे. रायगड जिल्‍ह्यात या निवडणूकांसाठी राजकीय पक्षांच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहेत. रायगडात जिल्‍हा परीषद अध्‍यक्षपद सर्वसाधारण उमेदवारासाठी जाहीर झाले आहे. मात्र मतदार संघांचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्‍यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्ष बुचकळयात पडले आहेत.

रायगड जिल्‍हयात जिल्‍हा परीषदेचे 59 मतदार संघ आहेत तर पंचायत समितीचे 118 मतदार संघ निश्चित झाले आहेत. कुठल्‍या मतदार संघात कुठली गावे असणार यावर शिक्‍का मोर्तब झाले आहे.परंतु हे मतदार संघ कुठल्‍या प्रवर्गासाठी आरक्षित करण्‍यात येणार आहेत हे अद्यापही ठरलेले नाही. त्‍यामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.

राजकीय पक्षांच्‍या नेत्‍यांनी आपापल्‍या पक्षांतील इच्‍छुकांना कामाला लागा असे आदेश यापूर्वीच दिल आहेत. त्‍यानुसार काहीजण कामाला लागले आहेत. आपापल्‍या संभाव्‍या मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. असे असले तरी आयत्‍यावेळी आपण ठरवलेला मतदार संघ दुसरयाच प्रवर्गासाठी आरक्षित झाला तर काय करायचे, मतदार संघावर घेतलेली मेहनत वाया जाईल, याची धास्‍ती सर्वांनाच आहे.

काही पुरूष उमेदवारांनी वेळ पडल्‍यास आपल्‍या पत्‍नीला उमेदवारी मिळवण्‍यासाठी तयारी सुरू केली आहे. पंचायत समिती सभापतीपदांच्‍या आरक्षणाची देखील अजून प्रतिक्षा आहे.

दुसरीकडे राजकीय पक्षांनी आपापल्‍या परीने तयारी सुरू केली असली तरी युती आघाडयांचे गणित अद्याप जुळायचे बा‍की आहे. जिल्‍हयात महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसत असला तरी जिल्‍हयातील राजकीय इतिहास आणि विद्यमान राजकीय स्थिती पाहता ही समीकरणे सरळ दिसत नाहीत. महायुतीमधील शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधून विस्‍तव जात नाही अशा परीस्थितीत त्‍यांच्‍यातील पेच कसा सुटणार हा प्रयन आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढण्‍याची भाषा करीत असले तरी अनेक ठिकाणी त्‍यांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. सर्वांत महत्‍वाचे म्‍हणजे या युती आघाडीच्‍या गणितांमध्‍ये अद्याप जाहीर न झालेल्‍या मतदार संघातील आरक्षणाचा अडसर आहे. त्‍यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्‍छुकांना आरक्षणाची प्रतिक्षा आहे.

मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अजून मतदार संघांचे आरक्षण ठरलेले नाही. आम्‍ही आमच्‍या संभाव्‍य उमेदवारांना तयारीचे आदेश दिले असले तरी आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत पुढील पावले टाकता येत नाही. महायुतीचे जागावाटपदेखील त्‍यावर अवलंबून आहे. – राजा केणी, जिल्‍हाप्रमुख शिवसेना.