मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज या सरकारमधील कोणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही, इतके सरकारचे दुर्लक्ष सुरू आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यासह कर्जमुक्त करण्याची गरज आहे. पण हे सरकार त्यांचे न ऐकता आपल्याच मस्तीत पुढे जात आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी बिहारमधील महिलांना भाजप सरकारकडून करण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या मदतीसह राज्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व राज्य सरकारवर निशाणा साधला. बिहारमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने तेथील महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे. हा पैसा दिला जात आहे त्याची पोटदुखी आम्हाला नाही.

पण जे राज्य, जिथे निवडणुका नाहीत, जसे महाराष्ट्र इथे निवडणुका नाहीत, आम्ही तुम्हाला सर्वात जास्त जीएसटी देतो. महाराष्ट्रातून देशाला जाणारा महसूल सर्वात जास्त आहे, पण आज मदत काही जाहीर झाली आहे का? आम्ही मागत असलेली मदत ही आमच्या हक्काची आहे. आमची हेक्टरी ५० हजारांची मागणी आहे. शेतकरी कर्जमुक्त करण्यात यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफीची घोषणा करावी. हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाईची घोषणा करा, पण हे होताना दिसत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर पैशांचा महापूर आला असता, पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारचा आवाज सरकारमध्ये कुणीही ऐकत नाही. सरकार आपल्या मस्तीत पुढे जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण त्यांना केवळ आश्वासन मिळाले. कोणतीही ठोस मदत जाहीर झाली नाही. हेच नव्हे तर मागच्या दोन-अडीच वर्षात जवळपास शेतकऱ्यांच्या मदतीच्या सुमारे १५ हजार कोटींची थकबाकी आहे. हे पैसे कुणाचे आहेत? दुसऱ्या राज्यात निवडणुका आल्यामुळे या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. बिहारमध्ये गत अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पण त्यानंतरही त्यांना अशी मते विकत घ्यावी लागत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.