मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात, मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लिम मतदार दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही ‘व्होट जिहाद ’ चे दुखणे जडले आहे, अशी घणाघाती टीका सांस्कृतिक कार्यमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. दुबार मतदारांना फोडून टाकण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या असून आता पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? असा सवालही शेलार यांनी केला.
मतदार याद्यांमधील घोळ, दुबार मतदार आदींविरोधात मनसेसह महाविकास आघाडीतील पक्षांनी मोहीम उघडली असून नुकताच मोर्चाही काढला. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी अनेक मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांचा तपशील आकडेवारीसह पत्रकार परिषदेत सादर केला. शेलार म्हणाले, भाजप कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही. मात्र महाविकास आघाडी आणि त्यांचा नवा भिडू राज ठाकरे हे जाती, धर्म, समाजांमध्ये भेदभाव करीत असून त्यांना आम्ही उघडे पाडणार, असा इशारा शेलार यांनी दिला. यावेळी शेलार यांनी काही मतदार याद्यांमधील मतदारांची नावे सादर करीत अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आणि मविआ आमदारांचे मताधिक्य याची तुलना केली. महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांचा विजय या दुबार मुस्लिम मतदारांमुळेच झाला, असे म्हणायचे का असा सवाल करीत शेलार यांनी राज ठाकरे आणि मविआवर टीका केली. भाजपची भूमिका नेहमीच ‘सर्वांना न्याय, पण कुणाचेही तुष्टीकरण नाही’ अशी आहे, असे शेलार यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चामध्ये निव्वळ असत्यकथन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना ‘जोर का झटका’ लागल्याने दिल्लीतील पप्पू ते गल्लीतील पप्पू पर्यंत सर्वांनी मतचोरीचे खोटे कथानक (फेक नरेटिव्ह) रचून रान उठविले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विरोधक खोट्या माहितीच्या आधारे त्याचाच पुढचा अंक रंगविण्य़ाचा प्रयत्न करत आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून मविआने केलेला खरा गैरव्यवहार दाबला जात आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
शेलार यांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांबाबत उपस्थित केलेले मुद्दे :
कर्जत – जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी आदी ३१ मतदारसंघांत २ लाख २५ हजार ७९१ दुबार मुस्लिम मतदार, त्यामुळे सर्व २८८ मतदारसंघात १६ लाख ८४ हजार २५६ दुबार मतदारांची संख्या असून शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ५५३२ मुस्लिम दुबार मतदार व त्यांचा १२४३ मतांनी विजय, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात ४७७ दुबार मुस्लिमांची मते आणि पटोले यांचा २०८ मतांनी विजय, शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार वरुण सरदेसांईंच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात १३ हजार ३१३ मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आणि त्यांचा ११ हजार ३६५ मतांनी विजय, बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर १४ हजार ९४४ दुबार मुस्लिम मते आणि त्यांचा ५३२४ मतांनी विजय झाला, असे शेलार यांनी नमूद केले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांची संख्या जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा मतदारसंघात ३०,६०१, राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदारसंघात ११७५, मित देशमुखांच्या लातूर शहर मतदारसंघात २०६१३, ज्योती गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघात १०६८९, अमीन पटेल (मुंबादेवी) ११,१२६, नितीन राऊत (उत्तर नागपूर) ८३४२, अस्लम शेख (मालाड पश्चिम) १७००७ आदी काही उदाहरणे शेलार यांनी दिली.
