मुंबई : उत्तर भारतीयांचा आणखी एक उत्सव मुंबईत साजरा होऊ लागला आहे. छठ पुजेचे प्रस्थ वाढल्यानंतर आता मुंबईत जितीया हा उत्सवही साजरा होऊ लागला आहे. जितीया उत्सव १४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी भांडूपच्या नैसर्गिक तलावावर मोठ्या संख्येने उत्तर भारतीयांनी एकत्रित येऊन उत्सव साजरा केला. गणेश विसर्जनास मानाई करण्यात आलेल्या तलावावर जितीया उत्सवाला परवानगी दिल्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत उत्तर भारतीय, बिहारींची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या समाजाचे उत्सव साजरे करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही वर्षात उत्तर भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणारी रामलीला, छठपूजा, कावड पूजा हे उत्सव मुंबईतही साजरे होऊ लागले आहे. या उत्सवाच्या आडून राजकारण आणि मतांची बेगमी (व्होट बॅंक) देखील होऊ लागली आहे. यंदा उत्तर भारतीयांचा जितीया उत्सवही मुंबईत साजरा झाला.

भांडूपच्या छत्रपती शिवाजी महाराज तलावावर जितीया उत्सव पार पडला. यावेळी उत्तर भारतीय समुहातील अनेक महिलांनी तलाव परिसरात वाजतगाजत एकत्र येऊन पूजा केली. त्यामुळे भांडूप परिसरातील बहुसंख्य मराठी भाषकांमध्ये नाराजी पसरली. दरम्यान, याबाबत मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मिनी कोकण… मिनी बिहार

गणेशोत्सव नुकताच पार पडला. त्यावेळी भांडूपच्या याच तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला पालिका प्रशासनाने मनाई केली होती. या पार्श्वभूमीवर जितीया उत्सवाला का प्रतिबंध केला नाही, असा सवाल येथील मराठी भाषकांनी उपस्थित केला आहे. याबाबत समाज माध्यमांवरून नाराजी व्यक्त केली आहे. भांडूपमध्ये मराठी विशेषत: कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. मात्र भांडूपची मिनी कोकण ही ओळख पुसून आता मिनी बिहार होणार असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागली आहे.

काय आहे जितीया उत्सव

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातील समाजामध्ये जितीया उत्सव साजरा केला जातो. अपत्यांच्या सुखासाठी जितीया उत्सवात कडक उपवास केला जातो. माता या उत्सवात उपवास करतात. तसेच नैसर्गिक जलस्रोतात उभे राहून पूजा करतात. यंदा हा उत्सव पंचागानुसार १४ सप्टेंबरला होता.