मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव आर्थिक मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधातून (एनडीआरएफ) मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
शहा हे एका कार्यक्रमासाठी गुरूवारी मुंबईत आले होते. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार अशा तिघांच्या स्वाक्षरीने शहा यांना मदतीचे निवेदन दिले.
राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून सुमारे ५० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना राज्य अपत्ती निवारण निधातून (एसडीआरएफ) दोन हजार २१५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर होत असून राज्याच्या धान्योत्पादनावरही परिणाम होणार आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांच्या पिकाचेच नव्हे, तर पशुधन, घरदार व अन्य नुकसानही झाले आहे. या मोठ्या आपत्तीच्या काळात शेतकरी व अन्य नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती निवारण निधी पुरेसा नाही. साधनसामग्रीची कमतरता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.