मुंबई : यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणातील मूळगावी जाण्याची मुंबईस्थित कोकणवासीयांची लगबग सुरू आहे. परंतु, इच्छित रेल्वेगाडीचे तिकीट मिळत नसल्याने, प्रवाशांना कोकणात जायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. मात्र, कोकणवासीयांसाठी एका अतिजलद रेल्वेगाडीला कायमस्वरूपी तीन शयनयान डबे जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या गाडीमुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या रेल्वेगाडीच्या डब्यात वाढ
गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३ हजरत निजामुद्दीन जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन जंक्शन दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीला कायमस्वरूपी तीन शयनयान डबे वाढविण्यात येणार आहेत.
सध्या या रेल्वेगाडीला किती डबे
हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जंक्शन दुरांतो एक्स्प्रेस आठवड्यातून एक वेळा धावते. हजरत निजामुद्दीनवरून ही रेल्वेगाडी शनिवारी रात्री ९.४० वाजता सुटते. तर, तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता एर्नाकुलम जंक्शन येथे पोहचते. तसेच ती एर्नाकुलम जंक्शन येथून मंगळवारी रात्री ११.२५ वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहचते. या रेल्वेगाडीला सध्या १९ एलएचबी डबे आहेत. यात प्रथम वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे दोन डबे, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे १० डबे, शयनयान तीन डबे, पॅन्ट्री कार एक डबा, जनरेटर कार एक डबा, एसएलआर एक डबा अशी संरचना आहे.
एकूण २२ एलएचबी डबे जोडणार
गाडी क्रमांक १२२८४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जंक्शन रेल्वेगाडीला २ ऑगस्टपासून आणि गाडी क्रमांक १२२८३ एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन रेल्वेगाडीला ५ ऑगस्टपासून एकूण २२ एलएचबी डबे जोडले जातील. यात यात प्रथम वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे दोन डबे, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे १० डबे, शयनयान सहा डबे, पॅन्ट्री कारचा एक डबा, जनरेटर कारचा एक डबा, एसएलआरचा एक डबा अशी संरचना आहे. यात तीन शयनयान डबे वाढल्याने अतिरिक्त प्रवाशांसाठी जागा उपलब्ध होणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सेवा सुरू
गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३ हजरत निजामुद्दीन जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन जंक्शन ही रेल्वेगाडी गेल्या १५ वर्षांपासून धावत आहे. या रेल्वेगाडीची पहिली फेरी ७ मार्च २०१० रोजी धावली. ही रेल्वेगाडी २,६३८ किमी अंतर ४१.५५ तासांत पार करते. या रेल्वेगाडीचा वेग ताशी ६८.०४ किमी असतो. या रेल्वेगाडीला १० थांबे आहेत. कोटा जंक्शन, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलोर जंक्शन, कोझिकोड या रेल्वे स्थानकात ही रेल्वेगाडी थांबते.