Heavy Rain prediction in Mumbai Thane Area: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शुक्रवार ते रविवार मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात गुरुवारी रात्री कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचबरोबर चक्रीय स्थिती याचाच प्रभाव म्हणून पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात रविवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस मुंबईत फारसा पाऊस पडलेला नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईच्या तापमानातही काहीशी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रासलेल्या मुंबईकरांना हा पाऊस दिलासा देणारा असेल, तर इतर भागातही पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहणार असल्याने यामुळे शेतीचे आणखी नुकसान होणार आहे. आधीच पिकांचे नुकसान झालेले असताना पुन्हा पडणाऱ्या पावसामुळे या नुकसानात भर पडणार आहे.

रायगड, पुणे घाट परिसराला अतिवृष्टीचा इशारा

रायगड जिल्हा तसेच पुणे घाट परिसराला रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रविवारी सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे दिवसभर संततधार पाऊस कोसळणार असून काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होईल.

चंद्रपूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

चंद्रपूर येथे शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला ३३.२ अंश सेल्सिअस, अमरावती ३३.८ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी ३४.२ अंश सेल्सिअस आणि नागपूर येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानाचा पारा चढा होता.

मोसमी वाऱ्यांची माघार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी आणखी काही भागातून माघार घेतली. संपूर्ण पश्चिम हिमालयीन प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे.

पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर, धाराशिव

मेघगर्जनेसह पाऊस

धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

मुसळधार पाऊस

पालघर, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली