मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरत असल्याचे कारण वरवरचे असून मुंबईतील मोक्याच्या जागा, चौक हडपण्यासाठी कबुतरखान्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक पूरण दोषी यांनी केला आहे. कबुतर खान्यावरील कारवाईच्या विरोधात ३ ऑगस्ट रोजी कुलाबा जैन मंदिर येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत शांतिदूत यात्रा काढण्यात येणार आहे. त्यात जैन समुदायासह, प्राणी मित्र सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली. कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.
कबुतरांना खाऊ घालणाऱ्या आणि याप्रकरणी कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तिविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला दिले. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होत असल्यामुळे कबुतरखाने बंद करण्याची मागणी होत असून या कारवाई विरोधात आता जैन समुदायाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
कबुतरांना खाद्य देणे बंद केल्यामुळे त्याविरोधात जैन समुदाय एकवटत असून कुलाबा येथील जैन मंदिरापासून रविवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी शांतीदूत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. जैन मंदिरात सामूहिक नवकार मंत्र जप करून पुढे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा आणि गणपती मंदिरात जाऊन आरती करून मग गेट वे ऑफ इंडिया येथे पाणी समर्पण करून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पूरष दोषी यांनी दिली.
पूरण दोषी हे मुंबई महापालिकेत १९९७ ते २००७ या कालावधीत कॉंग्रेसचे नगरसेवक होते. सध्या ते मुंबई कॉंग्रेसचे महासचिव आहेत. उद्या होणाऱ्या आंदोलनात केवळ जैन समुदाय नाही तर सर्व समुदायातील प्राणीप्रेमी सहभागी होणार असल्याची माहिती दोषी यांनी दिली.
मग कोंबडी विकणे बंद करा
श्वसनाचे आजार हे अनेक कारणांमुळे होतात. त्यात पक्ष्यांची विष्ठा हे एक कारण आहे. कोंबड्यांची विष्ठा सर्व बाजारात दिसते. मग तिथेही बंदी घातली पाहिजे, असेही दोषी यांनी म्हटले आहे. केवळ कबुतरखाने हटवणे यामागे मोक्याच्या जागा हेच मूळ कारण आहे. या मुंबईत केवळ कबुतरांनाच स्वत:ची अशी जागा आहे. पण या जागा मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्यामागे आर्थिक गणिते आहेत, असा आरोप दोषी यांनी केला आहे.