मुंबई : केईएम रुग्णालयातील न्यायवैद्यकीय विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांनी सहा महिला डॉक्टरांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला. त्यानंतर त्यांची बदली करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अंतर्गत तक्रार समितीने (आयसीसी) दिले होते. मात्र त्यानंतर समितीच्या निर्देशाचे उल्लंघन करून मागील तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयामधील निवासस्थानामध्ये राहत असल्याने महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र पॉश समितीचा अहवाल आल्यानंतर डॉ. देवकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सहा महिला डॉक्टरांच्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलिसांनी एप्रिलमध्ये केईएम रुग्णालयातील न्यायवैद्यकीय विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दोन ते तीन वर्षांमध्ये डॉ. देवकर यांच्याकडून छळ करण्यात येत होता. तसेच ते परीक्षक असल्याने परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण करण्याची धमकी देत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास भीती वाटत असल्याचे या महिला डॉक्टरांनी तक्रारीमध्ये म्हटले होते.
त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या समितीने केलेल्या चौकशीमध्ये देवकर दोषी आढळल्यानंतर तक्रारदार महिला डॉक्टरांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची केईएममधून बदली करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी त्यांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये, तसेच देवकर यांनी तत्काळ निवासस्थान रिकामे करावे असे आदेशही दिले होते.
देवकर दोषी आढळल्यानंतर तीन आठवड्यानंतरही त्यांनी रुग्णालयातील निवासस्थान सोडलेले नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णालय परिसरात त्यांची समोरासमोर भेट झाल्यावर आम्हाला भीती वाटत असल्याचे तक्रारदार महिला डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तसेच डॉ. देवकर त्यांची बदली रोखण्यासाठी प्रभावाचा वापर करत असल्याचेही तक्रारदाराकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठाता संगीता रावत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पॉश समितीच्या अहवालावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून, दोन दिवसांत तो अहवाल आल्यानंतर डॉ. देवकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच डॉ. देवकर यांना यापूर्वी निवासस्थान रिकामे करण्यासंदर्भात नोटीस पाठविल्याची माहिती दिली. तसेच यासंदर्भात डॉ. देवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.
पॉश समितीच्या अहवालामध्ये जे काही पुरावे मिळाले त्यानुसार डॉ. देवकर दोषी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या समितीने शिक्षा सुनावली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. आयुक्तांकडून येणाऱ्या आदेशानुसार डॉ. देवकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.