मुंबई : महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी झाली पाहिजे. विद्यापीठांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सर्व विद्यापीठांना एकत्र जोडणारे कृती दल स्थापन करावे. तसेच दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करेल अशी प्रणाली निर्माण करावी, असे मार्गदर्शन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातील उपस्थितीत विद्यापीठांच्या कुलगुरूंना केले.
राजभवन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि व्हिजन महाराष्ट्र २०४७’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.
विद्यापीठे ही विद्या आणि संस्कारांची केंद्रे असावीत. शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आत्मियतेने जोडलेले असावेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. तसेच खेळ, एनसीसी, एनएसएससारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तंदुरुस्त शरीर आणि सुदृढ मन हेच चांगल्या शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत. विद्यापीठांनी उद्योजगताशी निगडित रोजगारक्षम अभ्यासक्रम विकसित करावेत. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडले गेले पाहिजे.
नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण जितके गुणवत्तापूर्ण, तितकी शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये याविषयी संवेदनशील केले पाहिजे. विद्यापीठांनी अशा वक्त्यांना आमंत्रित करावे ज्यांच्या विचारांमधून जीवनमूल्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळेल. विद्यार्थ्यांशी संवाद वाढवा, त्यांच्या समस्या जाणून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
ज्या भावनेने काम करू, त्याच भावनेने विद्यार्थी देशाच्या प्रगतीस हातभार लावतील. शासन, शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी परस्पर सहकार्याने सतत संवाद आणि कृती ठेवली पाहिजे. नियोजन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम केल्यास महाराष्ट्र निश्चितच देशातील आदर्श शैक्षणिक राज्य बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढील १५ दिवसांत डिजिटल डॅशबोर्ड परिपूर्ण करावा – चंद्रकांत पाटील
‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप २०४७ व उच्च शिक्षण शैक्षणिक परिवर्तन : विद्यापीठांची भूमिका व योगदान’ या विषयावर मुंबई विद्यापीठात झालेल्या परिषदेमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार केलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत परिपूर्ण करावा असे आदेश दिले.
सर्व विद्यापीठांनी डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करावा यासाठी किमान दोन सदस्यांची स्वतंत्र तुकडी नियुक्त केली जाणार आहे. ही तुकडी विद्यापीठांना मार्गदर्शन करणार असून, प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन माहिती तपासेल. यामुळे डॅशबोर्डवरील आकडेवारी निर्दोष व अचूक राहील. दर तीन महिन्यांनी एकात्मिक आढावा बैठक घ्यावी. त्यातून उत्तम परिणाम साधता येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रलंबित मुद्दे ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढा
डॅशबोर्डची पूर्णता अत्यावश्यक असून त्यामध्ये त्रुटी नसाव्यात. डॅशबोर्डमध्ये कोणतीही चूक राहणार नाही याची दक्षता घ्या. सर्व माहिती एकाच ठिकाणी, डॅशबोर्डवर उपलब्ध असेल याची खात्री करा. प्रत्येक विद्यापीठाने स्वतःचा डॅशबोर्ड तपशीलवार तपासावा आणि त्यातील सर्व माहिती अभ्यासून पूर्ण करावी. सर्व प्रलंबित मुद्दे ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढावेत, असे निर्देश अपर मुख सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी दिले.
