मुंबई : सातत्याने वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलण्याची शिफारस अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. त्यांच्याकडे क्रीडा हे तुलनेने दुय्यम खाते देतानाच दत्ता भरणे यांच्यावर कृषीखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यपालांनी रात्री उशिरापर्यंत या खातेबदलास संमती दिली नव्हती. त्यांच्या स्वाक्षरीने आदेश निघाल्यानंतरच बदल प्रत्यक्ष अमलात येतील.

शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधाने करणे, विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळतानाची चित्रफीत आणि ‘शेतकरी नव्हे, भिकारी सरकार’ हे वक्तव्य यामुळे कोकाटे यांनी आपला पक्ष आणि सरकारला वारंवार अडचणीत आणले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोकाटेंवर नाराज होते. असे असतानाही त्यांचे मंत्रिपद वाचले असले, तरी त्यांच्याकडील महत्त्वाचे खाते मात्र काढून घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोकाटे आणि भरणे यांच्यात खात्यांमध्ये आदलाबदल करण्याची शिफारस केली. त्यानुसार कोकाटे यांचे कृषी खाते भरणेंकडे तर भरणेंकडील क्रीडा खाते हे कोकाटेंना देण्यात येणार आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी सदनिका लाटल्याबद्दल न्यायालायाने कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. वास्तविक त्यावेळीच कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे अपेक्षित होते. मात्र तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना अभय दिले होते. आता पुन्हा एकदा खातेबदलावर कोकाटेंची सुटका झाली आहे. रात्री उशिरापर्यंत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली नव्हती.

शिवसेनेच्या मंत्र्यांना मात्र अभय

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता कोकाटेंचे खाते बदलण्यात आले. एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होत असताना वादत अकलेले संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम, भरत गोगावले हे शिंदे गटाचे मंत्री मात्र अद्याप ‘सुखरूप’ आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहात असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे.

अजित पवारांची खेळी

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला, असे चित्र तेव्हा निर्माण झाले होते. यामुळेच कोकाटे यांचे खाते बदलण्याची शिफारस अजित पवारांनी केली. कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना धडा शिकविण्यात आल्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळू नये, अशी खेळी अजित पवारांनी केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.