मुंबई : ‘इतर मागास वर्ग’ प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करावा, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड या सहा जिल्ह्यांतील बहुतांश कार्यकर्ते उतरले आहेत.

सकाळी १० वाजता जरांगे आझाद मैदानात पोचले. त्यांचे भाषण होताच आंदोलक जिवाची मुंबई करायला बाहेर पडले. दरम्यान दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप सुरु होती. आंदोलकांच्या हाती भगव्या उपरण्याशिवाय काही नव्हते. भर पावसात गेटवे ऑफ इंडिया, हुतात्मा चौक, मंत्रालय, नरिमन पॉइंटकडे आंदोलक पायी भटकत होते. काही आंदोलक मंत्रालयासमोर हलगी व झांज वाजवत नाचायला होते. काहींनी लालबाग राजाच्या दर्शनासाठी मोर्चा वळवला. लालबाग राजाच्या दर्शनाला जाण्यासाठी चिंचपोकळी आणि कॉटन ग्रीन स्थानकावर उतरा अशी उद् घोषणा रेल्वेकडून करण्यात येत होती.

मंत्रालयासमोर हुल्लडबाजी करणाऱ्य आंदोलकांना पोलीस बाजुला होण्याचे आवाहन करत होते. मंत्रालयाचे समोरचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले. मंत्रालयसमोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांचे दरवाजे बंद करण्यात आले. बंगल्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी कडीकुलूपे लावण्यात आली होती. ४० मिनीटे मंत्रालयसमोर आंदोलकांनी हुल्लडबाजी केली. आंदोलकांचे नाचगाणे पाहायला मंत्रालयातील कर्मचारी खाली उतरले होते.

सीएसटीसमाेर आंदोलकांचे टेम्पो, ट्रक, जीप्स गाड्या होत्या. गाड्यामध्ये कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवले जात होते. पावसामुळे बहुतांश आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनमध्ये आसरा घेतला. आझाद मैदानावर सर्वत्र चिखल झाला आहे. पाण्याचे फक्त तीन टँकर आणि अवघी १० शौचकुपे इतकी सुविधा मुंबई महापालिकेने केली आहे.