Maharashtra Rain Updates : राज्यातील अनेक भागात अजूनही पावसाची संततधार सुरुच आहे. तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, संपूर्ण राज्यात शुक्रवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेले काही दिवस मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता पुन्हा पुढील चार ते पाच दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याने हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंंदाज व्यक्त करण्यात आला होता. वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबईसह ठाणे, पालघर, कोकणातील सर्व जिल्हे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानंतर शनिवार, रविवारी मुंबई, ठाणे भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यतादेखील आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईची स्थिती काय?
मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. मागील आठवडा मुंबईत फारसा पाऊस पडलेला नाही.
लोहगाव येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
लोहगाव येथे गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तेथे ३२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मागील काही दिवस विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद केली जात होती. त्यानंतर गुरुवारी लोहगाव येथे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. विदर्भात त्या तुलनेने गुरुवारी तापमानात घट झाली होती. तेथील तापमान साधारण २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान होते.
राज्यात आत्तापर्यंत ११३ टक्के पाऊस
राज्यात १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९७०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतो. यंदा या कालावधीत सरासरी १०९८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मोसमी वाऱ्यांची माघार
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी आणखी काही भागातून माघार घेतली आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारी बुशहर, रामपूर, हरिद्वार, मुरादाबाद, इटावा, बांसवाडा, वलाभ, विद्यापीठ नगर, वेरावळ या भागात आहे. मोसमी वारे पुढील दोन दिवसांत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांतून परतण्याची शक्यता आह.