मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यामुळे आलेल्या पूरामुळे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस सेवा खंडीत झाली आहे. परिणामी, प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात लक्षणीय घट झाली. पावसामुळे मार्ग तात्पुरते बंद करावे लागले असून अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या व मार्ग बदलण्यात आल्याने एसटीच्या दररोजच्या प्रवासी संख्येवर आणि महसूलावरही परिणाम झाला आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत एसटी महामंडळाचे तब्बल ८३ लाख ५२ हजार प्रवासी कमी झाले आहेत. दैनंदिन उत्पन्न सरासरी ३१ कोटी ३२ लाख रुपये असून ते अपेक्षित उत्पन्नापेक्षा अडीच ते तीन कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
पावसाचा थेट परिणाम – फेऱ्या रद्द व मार्गबदल
सातत्याने सुरू अस अतिवृष्टीमुळे बीड, लातूर आणि धाराशिव यासारख्या मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये; तसेच सोलापूरमध्ये राज्य परिवहनाच्या अनेक बस फेऱ्या दररोज रद्द करण्यात येत आल्या, वेळापत्रकात बदल करावे लागले. या जिल्ह्यांमधील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. तर, काही ठिकाणी पूर स्थितीमुळे रस्ता व पुलावर पाणी आले. परिणामी एसटीला काही सेवा रद्द कराव्या लागल्या. तर, काही पर्यायी मार्गाने बस फेऱ्या वळवण्यात आल्या.
प्रवासी संख्येवर आणि महसुलावर परिणाम
गणपती उत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यामध्ये एसटीला दैनंदिन उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित होती. सरासरी दैनंदिन उत्पन्नापेक्षा ३४ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज होता.
परंतु, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटीच्या उत्पन्नात आणि दैनंदिन प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३१ कोटी ३२ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येत दररोज घट झाली.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील एसटीचे दररोजचे उत्पन्न पावसामुळे घटले असून, सध्याच्या आव्हानात्मक काळात महिन्याच्या आकडेवारीत मोठी घसरण दिसून आली.
एसटीचा प्रतिदिन ३ ते ४ कोटी रुपये तोटा
जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये एसटीचे उत्पन्न हे एकूण वार्षिक सरासरी उत्पन्नापेक्षा कमी असते. परिणामी, सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा यानिमित्त एसटीचे उत्पन्न हळूहळू वाढू लागते. सध्या दर महिन्याचा खर्च भागवण्यासाठी एसटीला अंदाजे ३४ कोटी रुपये दरमहा उत्पन्न येणे गरजेचे आहे.
परंतु, गेले तीन महिने सातत्याने ३ ते ४ कोटी रुपये प्रतिदिन एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास एसटीला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडे हात पसरावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.