मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेद्वारे केला जात असला तरी अद्याप हा पूल सुरू झालेला नाही. १० जूनपर्यंत हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते मात्र जून महिना संपत आला तरी हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.
पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पूल आणि विक्रोळी येथील पूल सुरू झाल्यानंतर आता मुंबईकरांना शहर भागातील कर्नाक पूल कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. विक्रोळी पूल व कर्नाक पूल हे दोन्ही पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे उद्दिष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले होते. त्यापैकी विक्रोळी पूल सुरू झाला तरी कर्नाक पूल मात्र अद्याप वाहतूकीसाठी सुरू झालेला नाही.
दरम्यान, याबाबत पूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत म्हणजेच १० जून २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी (लेन मार्किंग), पथदिवे (स्ट्रीट लाईट), रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणी कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र गेल्या आठवडयात पावसामुळे ही कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे एक दिवस जरी उघडीप मिळाली तर ही कामे पूर्ण होतील. तसेच रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पुलाची पाहणी केली असून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पूल येत्या आठवड्याभरात सुरू होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. १२५ वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पूल पाडून टाकला. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले.
मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.सद्यस्थितीत आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.
या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्या उभारणीसाठी प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया (गर्डर) स्थापित करण्यात आल्या आहेत.
काम वेगाने पूर्ण केल्याचा प्रशासनाचा दावा
या पुलाचे काम वेगाने पूर्ण केल्याचा दावा पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. पुलाची पहिली तुळई ऑक्टोबर २०२४ रोजी आणि दुसरी तुळई जानेवारी महिन्यात बसवण्यात आली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यात हा पूल उभा केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिस विभागाच्या विशेष परवानगीने, महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत मागील दोन महिने दररोज २४ तास पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे विक्रमी वेळेत पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कर्नाक पुलाच्या कंत्राटदाराला १ कोटी ८० लाखाचा दंड
कर्नाक पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी लागणारे गर्डर म्हणजेच तुळई ३० एप्रिलपर्यंत येणार होते. ते न आल्यामुळे १ व २ मे रोजी कंत्राटदाराला दरदिवशी १० लाखांचा दंड लावण्यात आला होता. त्यानंतरही गर्डर आणण्यात तो अपयशी ठरल्यामुळे त्याला गर्डर येईपर्यंत दरदिवशी २० लाखांचा दंड करण्यात आला होता. १० मे रोजी गर्डर आल्यानंतर तातडीने पुढील कामे करण्यात आली. दहा दिवसांच्या विलंबासाठी कंत्राटदाराला १ कोटी ८० लाखांचा दंड करण्यात आला आहे.