मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती व्यवसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी केले आहे. प्रक्रियेचा भाग म्हणून लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
एखाद्या व्यक्तीला परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून लूकआऊट सर्कुलर जारी करण्यात येते. दोघांविरोधात लूकआऊट सर्कुलर जारी करण्यात आल्याच्या माहितीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. प्रकरणी लोटस कॅपिटल फायनान्स सर्विसचे संचालक दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी त्यांची ओळख राजेश आर्या नावाच्या व्यक्तीद्वारे झाली.
कुंद्रा आणि शिल्पा हे बेस्ट डिल टीव्ही प्रा. लि. या होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मचे संचालक होते. कंपनीसाठी त्यांनी कोठारी यांच्याकडून ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले, मात्र कर टाळण्यासाठी ते गुंतवणूक म्हणून दाखवले. त्यासोबत मासिक परतावा आणि मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासनही दिले.
कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ३१ कोटी ९० लाख रुपये शेअर सबस्क्रिप्शन करारान्वये आणि सप्टेंबर २०१५ मध्ये आणखी २८ कोटी ५३ लाख रुपये सप्लिमेंटरी कराराद्वारे हस्तांतरित केले. एप्रिल २०१६ मध्ये कुंद्रांनी वैयक्तिक हमीपत्र दिल्यानंतर काही महिन्यांतच शिल्पा शेट्टी यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. २०१७ मध्ये कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असल्याचे कोठारी यांच्या लक्षात आले.
तक्रारदाराच्या कंपनीने दिलेली रक्कम व्यवसायासाठी न वापरता आरोपींनी ती वैयक्तिक उपयोगासाठी वळवली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, असे तक्रारीत म्हटले आहे.