Shivsena Eknath Shinde Speech मुंबई : ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीला सत्ता मिळाली पाहिजे. कोणाचे कोणाबरोबर मनोमीलन होते त्याची तुम्ही चिंता बाळगू नका, त्याचा सामना करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत व योग्य वेळी समाचार घेऊ, अशा शब्दांत उद्धव व राज ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडला. ‘लोकसभा आपण जिंकली. विधानसभेत ८० जागा लढवून ६० जागा जिंकत विक्रम केला. आता आपल्याला महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा जिंकायच्या आहेत. त्यासाठी कायर्कर्त्यांनी सज्ज राहावे,’ असे आवाहन शिंदे यांनी केले. गेल्या तीन वर्षांत मुंबईच्या विकासासाठी महायुती सरकारने विविध कामे हाती घेतली. रस्त्यांची दैना कोणाच्या काळात झाली होती. आता नव्याने काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. मुंबईची सत्ता अन्य कोणाच्या ताब्यात जाऊ देऊ नका, अन्यथा मुंबई २५ वर्षे मागे जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार आहे. तुम्ही शिवसैनिकांनी ‘एकनाथ शिंदे’ समजून जोमाने काम करा. मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा. पुढचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आपल्याला धूमधडाक्यात साजरे करायचे आहे, अशा सूचना शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.

दसरा मेळाव्यायात शिंदे यांनी उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे जाणिवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. त्याच राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात. तेव्हा कुठे गेले ठाकरे यांचे हिंदुत्व, असा सवालही शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याची यांची कुवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पूरग्रस्तांना धीर, आर्थिक मदतही

पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी सरकार नक्कीच मदत करेल, असा विश्वास देत शिंदे यांनी धीर सोडू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. राज्यातील पूरग्रस्तांच्या मुला मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना उचलणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या आठ खासदारांनी एक महिन्याचे वेतन, मुंबईतील सहा आमदारांनी प्रत्येकी दोन लाख, अल्पसंख्याक विभागाचे नेते समीर काझी यांनी ११ लाख, शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी १० लाख, मंत्री गुलाबराव पाटील यांनी २५ लाख, आनंदराव अडसूळ यांनी अडीच लाख रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.