मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली असतानाही स्वत: उमेदवारी अर्ज न भरता, मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवून स्वपक्षाचीच कोंडी करणारे आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी या निवडणुकीत भाजपला शह देण्याची महाविकास आघाडीने तयारी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक मतदारसंघात भाजपने डावललेल्या उमेदवारास शिवसेनेने पाठिंबा द्यायचा व नागपूरची जागा काँग्रेसने लढवायची अशी महाविकास आघाडीची खेळी राहणार असल्याचे सांगण्यात येते. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचा पराभव करून भाजपलाही धडा शिकविण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेसला अमरावती व नाशिक पदवीधर मतदारसंघ सोडण्यात आले होते. नाशिकमध्ये विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु ऐनवेळी तांबे यांनी स्वत: अर्ज न भरता आपला मुलगा व प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून काँग्रेसचीच पंचाईत करून टाकली. ही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्यामुळे आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या कुणीही उमेदवाराने अर्ज भरला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून ही हक्काची जागा गेली, आता पुढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा – काँग्रेसकडून निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला कारवाईबाबत…”

नाशिक मतदारसंघात तांबे पिता-पुत्राने जो पक्षाला दगाफटका केला, त्यामागे भाजप असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तांबे यांनी भाजपचाही जाहीर पाठिंबा मागितला व त्याबाबत पक्ष विचार करेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. त्याचबरोबर भाजपच्या शुभांगी पाटील यांनी पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला लावला, परंतु त्यांना अधिकृत उमेदवारी दिली नाही. त्याचा आधार घेत महाविकास आघाडीने नवे डावपेच टाकण्याचे ठरविले आहे. आघाडीच्या नेत्यांमध्ये रात्री तशी चर्चा झाल्याचे समजते.

नाशिक मतदारसंघात भाजपने अधिकृत उमेदवारी न दिलेल्या परंतु अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा द्यायचा, त्या बदल्यात नागपूरची जागा शिवसेनेऐवजी काँग्रेसने लढवायची अशी नवी खेळी खेळली जाणार आहे. नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा देऊन तांबे पितापुत्रांची कोंडी करायची, तसेच भाजपला शह द्यायची अशी रणनीती ठरली आहे. याबाबतच निर्णय आम्ही उद्या घोषित करू, असे नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडी ही जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला आहे.

आणखी वाचा – उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

नाशिकमधील उमेदवारीचा प्रश्न नीट हाताळता आला असता

पुणे : नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न नीट बसून हाताळता आला असता. आपापसात चर्चा करून हा प्रश्न सुटणे अवघड नव्हते. काँग्रेस नेत्यांनी सामंजस्य दाखविले असते, तर हा उमेदवारीचा घोळ झाला नसता. अजूनही हा प्रश्न सुटू शकतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे रविवारी माध्यमांशी बोलताना दिली. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असले, तर त्याचा आनंद खुशाल घ्यावा, अशी खोचक टिपणीही पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आणखी वाचा – फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

‘बुधवारी भूमिका मांडणार’

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीने आमदार सुधीर तांबे यांना पक्षातून त्यांची चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. चौकशीनंतर तांबे यांच्यावर पुढील अंतिम कारवाई होणार आहे. डॉ. तांबे यांनीही या सर्व घडामोडींबाबत १८ जानेवारीला आपली भूमिका जाहीर करू असे सांगितले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir tambe suspended from congress after he withdraws candidature for maha legislative council polls zws