scorecardresearch

फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलाविणे, त्यांनी सूचक वक्तव्य करणे यातच तांबे यांच्या वेगळ्या भूमिकेचा अंदाज आला होता.

फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे
फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे ( Image – Social Media )

संतोष प्रधान

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत विचार करण्याचे भाजपने जाहीर केले. तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेले वक्तव्य तेव्हाच तांबे यांच्या बंडाची बिजे रोवली गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यातून मध्य प्रदेशात गेल्यावर सत्यजित तांबे यांच्या भाषांतरित पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत झाले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचवल्या होत्या. कारण नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित हे इच्छुूक असल्याचे साऱ्या काँग्रेस नेत्यांना माहित होते. फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलाविण्यामागेच काही तरी वेगळा डाव असल्याची चर्चा तेव्हा काँग्रेसच्या वर्तुळात झाली होती.

हेही वाचा… कोल्हापूर जिल्ह्यात संयुक्तपणे लढण्यावर महाविकास आघाडीत ऐक्य

पुस्तक प्रकाशन समारंभाला सत्यजित तांबे यांचे मामा व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी सत्यजित यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ‘अशा नेत्यांना किती दिवस बाहेर ठेवणार. मग अशा नेत्यांकडे आमचा उगाचच डोळा जातो’ असे सूचक वक्तव्य फडण‌वीस यांनी तेव्हा केले होते. फडणवीस यांच्या भाषणानंतरच सत्यजित हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर भाजपने तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास विचार करण्याचे दिलेले आश्वासन आणि भाजपच्या उमेदवाराने पक्षाचे अधिकृत पत्र न देता अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज यातूनच भाजपची खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते.

हेही वाचा… विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पणासाठी पालकमंत्र्यांच्या परवानगीची सक्ती

फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलाविणे, त्यांनी सूचक वक्तव्य करणे यातच तांबे यांच्या वेगळ्या भूमिकेचा अंदाज आला होता. तांबे हे आपण काँग्रेसचेच असल्याचा दावा करीत असले तरी अपक्ष म्हणून त्यांच्यावर कसलेच बंधन राहणार नाही. कदाचित भाजपला अनुकूल अशी भूमिका ते घेऊ शकतात.

हेही वाचा… उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

काही वर्षांपूर्वी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस हे कसे सर्वांशी संपर्कात असतात, त्यांचा स्वभाव याचे कौतुक करणारे ट्वीट तांबे यांनी केले होते. त्यावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मग थेट भाजपमध्येच जा, असा सल्ला तांबे यांना ट्वीटच्या माध्यमातूनच दिला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 13:01 IST

संबंधित बातम्या