मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या तुलनेत इतर भागात पावसाचा जोर कमी आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य भागाकडे सरकून झारखंड आणि उत्तर छत्तीसगड पार करण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा दक्षिण राजस्थान ते दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारील परिसरावर आहे. तसेच नैऋत्य मोसमी वारेही सक्रिय आहेत.
त्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दक्षिण पश्चिम बंगाल , पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहील. या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल.
ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार
मुंबईत हलक्या सरींचा तर ठाणे आणि पालघर परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहतील. मुंबईत मागील दोन तीन दिवसांपासून अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १३ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाचा कुठे, कसा?
अतिमुसळधार – रत्नागिरी, सातारा घाट परिसर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ
मुसळधार – ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर
हलक्या सरी – मुंबई, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव