गडचिरोली : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांच्यासोबत मंत्री धर्मरावबाबा आत्राम देखील महायुतीत सामील झाले. त्यांचा हा निर्णय न पटल्याने भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांची भेट घेत मनातील खदखद बोलून दाखवली होती. तेव्हाच त्यांच्या प्रवेशाचे ठरले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहेरी येथे केला. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त ते अहेरी येथे आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी आपली आपली मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावई ऋतुराज हलगेकर हे शरद पवार गटात जाणार असल्याचे सांगून टीका केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त अहेरी येथे आयोजित कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला.
हे ही वाचा…बुलढाणा : मानव-वन्यजीव संघर्ष; तब्बल पाच बिबट जेरबंद…
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी मला अधिक बोलायचे नाही. परंतु जे झाले ते वाईट आहे. भाग्यश्रीला बापाने दूर केले असले तरी शरद पवार त्यांच्या पाठिशी आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतरही आमचे प्रश्न सुटत नाही, अशी खंत घेऊन मधल्या काळात भाग्यश्री आमच्याकडे अनेकदा आल्या. तेव्हापासून त्या आमच्या संपर्कात आहेत. अहेरी विधानसभेवर आमचा दावा आहे. जागावाटपानंतर अहेरी विधानसभेत शरद पवार यांची सभा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी अहेरी विधानसभेतील आरोग्य आणि रस्त्यांच्या दूरवस्थेवरून पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आत्राम यांच्यावर टीका केली. सूरजागड लोहप्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसून आमचे सरकार आल्यास स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी आमदार अनिल देशमुख, मेहबूब शेख, अतुल गाण्यारपवार यांचीही भाषणे झाली.
हे ही वाचा…वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
शरद पवारांनी घर फोडले नाही, मीच तीनवेळा भेटले
शरद पवार यांनी घर फोडल्याच्या मंत्री धर्मरावबाबांच्या आरोपाला भाग्यश्री आत्राम यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, त्यांनी घर फोडले नाही, मी स्वतःच त्यांना तीनवेळा भेटले. धर्मरावबाबा आत्राम यांचे १९९० मध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. तेंव्हा शरद पवार यांनी प्रयत्न करून त्यांची सुटका केली होती. हे उपकार कधी विसरता येणार नाहीत. आता मी त्यांच्या पक्षात काम करून हे ऋण फेडणार आहे, असे त्या म्हणाल्या.